Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarTeam Lokshahi

राऊतांना जामीन मंजूर झाल्यानंतर मंत्री मुनगंटीवार यांचे मोठे विधान; त्यानंतर त्याला पुन्हा अटक...

गज्या मारणे नावाचा एक गुंड होता. त्यालाही जामीन मिळाला होता. तो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मोठी रॅली निघाली
Published by :
Sagar Pradhan

मागील अनेक महिन्यांपासून शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात कोठडीत होते. मात्र, आता संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आहे. तब्बल 102 दिवसानंतर राऊत यांना जामीन मिळाल्याने शिवसैनिकांकडून राज्यभर जल्लोष साजरा करण्यात येत आहे. राऊतांच्या जामिनावर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे विधान केले आहे.

Sudhir Mungantiwar
कुणाला जामीन मिळाला म्हणून आम्हाला घाबरण्याचं कारण काय?- उदय सामंत

काय म्हणाले मुनगंटीवार?

संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर मुनगंटीवार बोलताना म्हणाले की, “भारतीय जनता पार्टी किंवा एखादा राजकीय पक्ष म्हणून या घटनेकडे एका विशिष्ट नजरेतून बघण्याची आवश्यकता नाही. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. एखादा राजकीय नेता असो वा एखादा सामान्य गुन्हेगार असो, जेव्हा त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं जातं, त्यानंतर विशिष्ट कालावधीने त्याला जामीन मंजूर केला जातो.

“या प्रकरणात संजय राऊत निर्दोष आहेत किंवा न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर पूर्णपणे रद्द केलाय, अशी कोणतीही माहिती अद्याप मला मिळाली नाही. असं अनेक प्रकरणांत घडलं आहे. अर्णव गोस्वामी यांनाही जामीन मिळाला होता, पण खटला अजून संपला नाही. नवनीत राणा यांनी खासदार म्हणून काही मुद्दे उपस्थित केले होते. त्यांनाही अटक झाली होती, त्यानंतर त्यांनाही जामीन मिळाला. केतकी चितळे यांनीही सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. त्यानंतर त्यांचीही जामिनावर सुटका झाली. पण त्यांचा खटला अद्याप सुरू आहे. यामुळे जामीन मिळण्याचा खटल्याच्या निर्णयाशी काहीही संबंध नाही” अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली आहे.

मुनगंटीवार पुढे म्हणाले की, गज्या मारणे नावाचा एक गुंड होता. त्यालाही जामीन मिळाला होता. तो तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मोठी रॅली निघाली. त्यानंतर त्याला पुन्हा अटक झाली, ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. त्यामुळे संजय राऊतांना जामीन मिळण्यावर भाष्य करण्यासारखं काहीही नाही. त्यांची जेव्हा निर्दोष मुक्तता होईल, तेव्हा यावर प्रतिक्रिया देता येईल. आताच यावर प्रतिक्रिया देणं जरा घाईचं ठरेल, असंही मुनगंटीवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com