Raj Thackeray | Balasaheb Thackeray | Uddhav Thackeray
Raj Thackeray | Balasaheb Thackeray | Uddhav ThackerayTeam Lokshahi

'विचारांचा वारसा मी जतन करतोय' राज ठाकरेंनी दिला बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा

माझ्याकडे जर काही आले असेल तर तो विचारांचा वारसा मी जतन करतोय. संस्कार कुणी करत नसते. कृती घडताने ते संस्कार वेचायचे असतात. ते संस्कार वेचत गेलो.

आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी केली जात आहे. मात्र, शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जयंतीवरून चांगलीच जुंपलेली दिसली. त्यातच जयंतीनिमित्त आज मुंबईत षण्मुखानंद सभागृहात ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. तर दुसरीकडे शिंदे-फडणवीस सरकारने विधी मंडळात बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण झाले. याच कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या शैलीत आठवणींना उजाळा दिला.

Raj Thackeray | Balasaheb Thackeray | Uddhav Thackeray
'मुख्यमंत्रीपदासाठी बाळासाहेबांनी कधीही विचारांशी तडजोड केली नाही' मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोमणा

काय म्हणाले राज ठाकरे?

मी लहानपणापासून अनेक गोष्टी बघितल्या आहे. पराभव झालेली अनेक लोक रडत बाळासाहेबांना भेटायला यायची. त्यांना सांभाळणारे बाळासाहेब, निवडून येणाऱ्या लोकांशी बोलणारे बाळासाहेब, वेगवेगळी प्रसिद्ध लोक भेटायला आल्यानंतर त्यांच्याशी बोलणारे बाळासाहेब, हे सगळं मी लहानपणापासून पाहत आलो आहे.

उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

सव्वा तीन वर्षानंतर बाहेरच्या होर्डिंग्सवर, सभागृहात शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुह्दयसम्राट हे लागतेय त्याबद्दल मी नार्वेकरांचे अभिनंदन करतो. ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला ही इमारत बघायला मिळाली त्या बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र अनावरण इथं होतोय. विधानसभेत, विधान परिषदेत हे तैलचित्र असावीत. आपण कुणामुळे इथे आलो ते कळेल असं सांगत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.

बाळासाहेब बाहेर वेगळे आणि घरात वेगळे असं नव्हते

बाळासाहेब मला शाळेतून न्यायला यायचे. शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, घरातला व्यक्ती अशा विविध अंगाने मी बाळासाहेबांना पाहत आलो. वारसा हा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो. माझ्याकडे जर काही आले असेल तर तो विचारांचा वारसा मी जतन करतोय. संस्कार कुणी करत नसते. कृती घडताने ते संस्कार वेचायचे असतात. ते संस्कार वेचत गेलो. मी अत्यंत कडवट मराठी आहे. हिंदुत्ववादी घरात माझा जन्म झालाय. हा कडवटपणा लहानपणापासून पाहायला मिळालं. बाळासाहेब बाहेर वेगळे आणि घरात वेगळे असं नव्हते असंही राज म्हणाले.

हा माणूस कठोर होता, तितकाच मुलायम, साधा होता.

बाबरी पडली असा फोन आला होता. जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला अभिमान वाटतो असं एका क्षणी बाळासाहेबांनी म्हटलं. अशा प्रसंगात जबाबदारी अंगावर घेणे किती मोठे असते. हा माणूस कठोर होता, तितकाच मुलायम, साधा होता. त्यांचे विनोद काही वेळा सांगताही येणार नाहीत. विलक्षण व्यक्तिमत्व बाळासाहेब होते. लहानपणापासून मी बाळासाहेबांसोबत वावरल्यामुळे मी स्वत:चा राजकीय पक्ष काढू शकलो. ही हिंमत माझ्यात आली. यश पचवू शकलो, पराभवाने खचलो नाही. बाळासाहेबांचे तैलचित्र विधानभवनात लागतेय. ज्या इमारतीत बाळासाहेबांनी इतके शिलेदार पाठवले. त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो असंही राज ठाकरेंनी भाषणात म्हटलं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com