देवेंद्र फडणवीस यांना सत्तेची लालसा; नाना पटोलेंचे टीकास्त्र
अभिराज उबाळे | पंढरपूर : कर्नाटक निवडणूकमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे विरोधात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात उतरले असून मी पुन्हा येणार याचा पुनरुच्चार केला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. फडणवीसांच्या या कृतीमुळे भाजपची सत्तेची भूक स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली आहे.
फडणवीस हे दिवसा स्वप्न पाहतात. मागील वेळी ते पुन्हा येईन म्हणाले होते. पण आले नाहीत. आलेतर उपमुख्यमंत्री म्हणून आले. माझ्यासारखा असता तर मी उपमुख्यमंत्री पद घेतले नसते, असा टोलाही पटोलेंनी फडणवीसांना लगावला. फडणवीस यांची सत्तेची लालसा यावरून दिसून येते. त्यांना जनतेच्या कामापेक्षा सत्तेची लालसा जास्त दिसून येते, असेही त्यांनी म्हंटले आहे.
भाजपासाठी मध्य भारतामध्ये गाय आई असते. तर गोवा आणि नॉर्थ ईस्टमध्ये ती खाण्याची वस्तू असते. गायींप्रमाणेच त्यांचे माणसाबद्दलचे मत असणार आहे. ज्या अर्थी भाजप महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात प्रचार करते. त्याअर्थी त्यांना मराठी माणसाशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त सत्ता पाहिजे, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहेय
भाजपा सर्वत्र मगरीचे अश्रू काढत असते. एकदा शिकार हातात आली की त्याचा फरशा पडल्याशिवाय भाजप राहत नाही. कर्नाटकात सत्तेत येण्यासाठी भाजप शेवटच्या घटकापर्यंत प्रयत्न करेल. मात्र, नॅनो गाडीमध्ये बसतील तेवढेच आमदार त्यांचे निवडून येतील आणि काँग्रेसची कर्नाटकात सत्ता येईल, असा दावा पटोले यांनी केला.
दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत असतात. मात्र, आम्ही वरिष्ठ पातळीवरील नेते सर्व एक आहोत. आणि यापुढे संजय राऊत वादग्रस्त वक्तव्य करणार नाहीत, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा पुन्हा सुरू होतील. मध्यंतरी अवकाळी पाऊस गारपीट यामुळे या सभांना ब्रेक लागला होता, असेही त्यांनी सांगितले.