Nana Patole : सुषमा अंधारे यांनी काही नवीन ट्विट केलेलं नाही...
पुण्यातल्या येरवडा जेलच्या कैद्यांना पोलिसांच्या आशीर्वादानं वस्तूंचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ लोकशाहीच्या हाती लागलाय. एका निर्जनस्थळी पोलिसांची व्हॅन थांबवून कैद्यांना वस्तू पुरवल्या जात असल्याचं या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओत कैद्यांचे नातेवाईक आधी पोलिसांना चिरीमिरी देतात मग पोलीस व्हॅनचा मागचा दरवाजा उघडून काही वस्तू कैद्यांना देत असल्याचं या व्हिडिओत स्पष्टपणं दिसतंय. त्यामुळं जेलमध्ये फाईव्हस्टार सुविधा मिळवणारा ललित हा एकटा नसल्याचं अधोरेखित झालंय. हा व्हिडिओ शिवसेना नेत्या सुषमा अंधारेंनी ट्विट केलाय. हा व्हिडिओ कधीचा आहे याची खातरजमा लोकशाहीनं केलेली नाही. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर असे म्हणत सुषमा अंधारे यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
सुषमा अंधारे व्हिडिओ शेअर करत म्हणाल्या की, उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली.. कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड असे त्या म्हणाल्या.
याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी काही नवीन ट्विट केलेला नाही. जेलमध्ये बसलेल्या बगलबचच्यासाठी सुविधा मिळत आहे. हे फक्त येरवडा बद्दल नाही. हे गुन्हेगार आणि माफिया यांना संरक्षण देणारे सरकार आहे. असे नाना पटोले म्हणाले.