Video : नरहरी झिरवाळ यांचा पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे त्यांच्या बोलण्याच्या शैलीसाठी आणि साध्या राहणीमानामुळे ओळखले जातात

महेश महाले | नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे त्यांच्या बोलण्याच्या शैलीसाठी आणि साध्या राहणीमानामुळे ओळखले जातात. नुकताच त्यांनी परदेश दौरा केला तेव्हा मराठमोळ्या पेहरावाची चर्चा झाली होती. आता त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून यात ते पत्नीला खांद्यावर घेऊन डान्स करताना दिसत आहेत. एका लग्नसोहळ्यावेळी त्यांनी डान्स केला.

नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये त्यांनी संभळ या पारंपरिक नृत्यावर ठेका धरला आहे. नरहरी झिरवळ हे नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यात वनारे हे त्यांचे गाव असून ते आदिवासी बहुल भागात आहे.

गेल्या महिन्यात नरहरी झिरवळ हे पत्नीसह जपान दौऱ्यावर गेले होते. तेव्हा सदरा, धोतर, डोक्यावर गांधी टोपी, पायात चपला अशा पेहरावात ते होते. तर पत्नी नऊवारी लुगडं, कपाळाला कुंकू, गळ्यात पोत घालून होत्या. झिरवळ दाम्पत्याचे जपानमधल्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव झाला होता. आणि आता त्यांनी पत्नीला थेट खांद्यावर घेत डान्स केल्याने त्यांचा साधेपणा पुन्हा एकदा चर्चेत आलाय

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com