उध्दव ठाकरे लबाड लांडगा; नारायण राणेंचा घणाघात

उध्दव ठाकरे लबाड लांडगा; नारायण राणेंचा घणाघात

उध्दव ठाकरेंची मेळाव्यात भाजपवर टीका; नारायण राणेंचा पलटवार

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी गटनेत्यांचा मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली. यावर आज भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. यातच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही उध्दव ठाकरेंवर शरसंधान साधले आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कुणाला कानफाटी तरी मारली का? पक्ष वाढीसाठी काही केलं का? आयत्या बिळावर ते नागोबा आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे.

नारायण राणे म्हणाले की, शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळी उद्धव ठाकरे सहा वर्षाचे होते. मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी ते राजकारणात सक्रिय झाले. आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कुणाला कानफाटी तरी मारली का? पक्ष वाढीसाठी काही केलं का? आयत्या बिळावर ते नागोबा आहेत, थेट मुख्यमंत्री झाले. शिवसेना घडायला, वाढायला, सत्तेवर यायला शिवसैनिकांचा त्याग आहे, यामध्ये उद्धव ठाकरे वा आदित्य ठाकरे यांचा संबंध नाही. दूध पाजले म्हणता, मग सत्तेत असताना खोक्यांच्या रुपात तूप कोण खाल्लं? यशवंत जाधव यांनी याआधी ते सांगितलं होतं, असे टीकास्त्र नारायण राणे यांनी उध्दव ठाकरेंवर सोडले आहे.

उद्धव ठाकरे यांना अमित शाह यांचा मुंबई दौरा का भोवला? अमित शाह हे देशाचे गृहमंत्री, ते कुठेही जातील. उद्धव ठाकरे म्हणाले की अमित शाह यांनी शिवसेनेला आस्मान दाखवा असं म्हटलं होतं. त्यांना जमीनीवर या असं म्हणायचं होतं. आता ते आस्मान दाखण्याची भाषा करतात, ते कुणाच्या जीवावार, असा सवालही त्यांनी विचारला आहे.

बापाचं धोरण न पाळू शकणाऱ्या मुलाची दशा पाहून आम्ही बाहेर पडलो, याला चोरी केली असं म्हणत नाहीत. बाळासाहेब आयुष्यभर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत लढले. त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचे विचार मातीत घातले. देशाच्या मोठ्या नेत्यांना गिधाडं म्हणाले, हाच लबाड लांडगा आहे. उद्धव ठाकरे यांच्याएवढा खोटारडा माणूस मी आयुष्यात कधीही पाहिला नाही. युतीमध्ये असताना मला मंत्रीपद मिळू नये म्हणून उद्धव ठाकरे अमित शाह यांना फोन करत होते, असा खुलासा त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांना आता गटप्रमुख आठवले, अडीच वर्षात सत्तेत असताना त्यांनी किती गटनेत्यांना भेटी दिल्या, त्यांना मदत केली का? उद्धव ठाकरे हे आता गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचलं आहेत. त्याआधी मंत्र्यांनाही भेट द्यायचे नाहीत, अशी टीकाही राणेंनी केली आहे.

मराठी माणसाला हद्दपार करण्यामध्ये उद्धव ठाकरे यांचाच हात आहे. त्यांनी मराठी माणसाच्या हिताचं बोलू नये. गद्दारांना दूध पाजलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी सत्तेत असताना खोक्याच्या रुपात तूप खाल्लं, असा हल्लाबोल नारायण राणे यांनी केला आहे.

Lokshahi
www.lokshahi.com