ईडी तुमच्याही मागे, आदित्यही तुरुंगात जाणार; नारायण राणेंचा उध्दव ठाकरेंना इशारा

ईडी तुमच्याही मागे, आदित्यही तुरुंगात जाणार; नारायण राणेंचा उध्दव ठाकरेंना इशारा

संजय राऊतांचे नाव घेत नारायण राणेंचा उध्दव ठाकरेंना इशारा

मुंबई : : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी बुधवारी गटनेत्यांचा मेळाव्यात शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. या मेळव्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत सध्या कोठडीत आहेत. हाच धागा पकडत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

तुरुंगात असतानाही संजय राऊत यांची खुर्ची रिकामी ठेवण्यात आली. पण, तुम्हीही अजून सुटला नाहीत. ईडी तुमच्याही मागे आहे, आदित्यही सुशांत सिंह प्रकरणात तुरुंगात जाणार, असा इशाराच नारायण राणे यांनी उध्दव ठाकरे यांना दिला आहे. अडीच वर्षात केवळ तीन तासामध्ये हे मंत्रालयात बसले, अशी घणाघाती टीकाही राणेंनी उध्दव ठाकरेंवर केली आहे.

उद्धव ठाकरे यांना आता गटप्रमुख आठवले, अडीच वर्षात सत्तेत असताना त्यांनी किती गटनेत्यांना भेटी दिल्या, त्यांना मदत केली का? उद्धव ठाकरे हे आता गटनेत्यांपर्यंत येऊन पोहोचलं आहेत. त्याआधी मंत्र्यांनाही भेट द्यायचे नाहीत, अशी टीका राणेंनी केली आहे.

तर, संजय राऊतांच्या रिकाम्या खुर्चीवरुन मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही उध्दव ठाकरेंना टोला लगावला होता. बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी ही बांडगुळं आहेत. मग यांना काय उत्तर द्यायचं? यांचं स्वत:चं कर्तृत्व शून्य आहे. म्हणून मग कुणाला मिंधे, कुणाला मुन्नाभाई, कुणाला आणखी काही म्हणत राहायचं. आज संजय राऊतांची खुर्ची रिकामी होती. उद्या तुमचीही खुर्ची रिकामी ठेवावी लागेल. तयारी ठेवा, असा इशारा उध्दव ठाकरेंना संदीप देशपांडे यांनी दिला होता.

Lokshahi
www.lokshahi.com