नवाब मलिकांचं ठरलं! राष्ट्रवादीच्या 'या' गटाला पाठिंबा?
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिकांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला. मलिक तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांच्या घरी राजकीय भेटीगाठी वाढल्या आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी मलिकांची भेट घेतल्यानंतर नवाब मलिक आपले मत कोणाच्या पारड्यात टाकणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. अशातच, नवाब मलिक अजित पवार गटाला पाठिंबा देणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल परशुराम सेनेचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी वादग्रस्त विधान केले होते. याविरोधात अजित पवार गटाच्या कार्यालयाकडून उद्या आंदोलन करणार असल्याची माहिती आहे. हे आंदोलन मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे यांच्या वतीने आंदोलनाची ही घोषणा करण्यात आली आहे. यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
दरम्यान, अजित पवार आणि शरद पवार गटाने भेट घेतल्यानंतर नवाब मलिक यांनी कोणाल पाठिंबा देणार हे स्पष्टपणे सांगितले नव्हते. सध्या तब्येतीवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, आता अजित पवार गटाच्या कार्यालयाकडून आलेल्या मेसेजमुळे नवाब मलिक यांचे ठरलं का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.