'काँग्रेसने चर्चा करायला हवी होती' नशिक पदवीधर निवडणुकीबाबत शरद पवारांचे मोठे विधान
नाशिक पदवीधर मतदार संघात उमेदवारीवरुन काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी घडल्या. काँग्रेसनं सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती, पण त्यांनी ऐनवेळी फॉर्म भरला नाही. त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण तापलं. महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला. त्यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील मोदी बागेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी शिवराज राक्षे याचं अभिनंदन आणि सत्कार केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत चर्चा झाली नाही. काँग्रेसने याबाबत आधीच चर्चा करायला हवी होती. बाळासाहेब थोरात टोकाची भूमिका घेत नाहीत. चर्चा केली असती तर मार्ग निघाला असता, असं पवार म्हणाले. नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसच्या पाठिंब्याबाबत विचारलं असता. ते म्हणाले कुणाला पाठिंबा द्यायचा हा त्यांचा अधिकार असल्याचं ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसकडे औरंगाबादची जागा, नागपूरची जागा शिवसेनेला आणि अमरावती आणि नाशिकची उमेदवारी काँग्रेसला देण्याचा निर्णय झाला होता. नाशिक पदवीधर मतदारसंघातील सध्याचे चित्र पाहता काळजी करण्यासारखेच आहे. हा विषय नीट हाताळता आला असता. काँग्रेसने ज्यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यांचे काम आणि सर्वांना बरोबर घेण्याची भूमिका चांगली आहे.
मात्र तरूण कार्यकर्त्यांचा अर्ज आल्यानंतर चर्चेने हा प्रश्न सोडविता आला असता. ज्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे, ते युवक चळवळीशी सक्रिय आहेत. त्यामुळे प्रमुख नेत्यांनी आपासपसात चर्चा करून प्रश्न सोडविणे अवघड नव्हते. बाळासाहेब थोरात पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. विधिमंडळाचे ते गटनेता आहेत. टोकाची भूमिका ते घेत नाहीत. त्यामुळे सामंजस्याने हा प्रश्न सुटला असता.”