अमृता फडणवीसांच्या 'त्या' विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, मला त्याचं समाधान...
राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार हे मागील काही काळापासून नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यातच दुसरीकडे अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यावर या चर्चांना उधाण आलं आहे. त्यावरच बोलताना काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. अमृता फडणवीसांच्या प्रतिक्रियेवर आता अजित पवारांनी भाष्य केले आहे.
काय म्हणाले अजित पवार?
अमृता फडणवीसांच्या प्रतिक्रियेबाबत अजित पवारांना माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले ती, 'मग त्यात वाईट काय आहे मला जर कुणी चांगलं म्हणत असेल, तर मला त्याचं समाधान आहे. प्रत्येकाने चांगलं काम करावं म्हणजे प्रत्येकाला लोक चांगलं म्हणतील. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. मी त्याला काय उत्तर देऊ शकतो हे मला कळलेलं नाही.' असे ते यावेळी म्हणाले.
काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस?
पुण्यातील एका उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवार मुख्यमंत्री झालेले आवडतील असा प्रश्न माध्यमांकडून विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना त्या म्हणाले की, महाराष्ट्रासाठी 24 तास झोकून देऊन काम करणारा कोणताही माणूस मला मुख्यमंत्री झालेला आवडेल. मला वाटतं महाराष्ट्र असं राज्य आहे जे खूप काही करू शकतं. खूप काही करत आहे. यासाठी जो माणूस आपल्याला जनतेला पुढे नेतो तो व्यक्ती किंवा पक्ष चांगला आहे. मग तो कोणीही असला तरी चालेल. असं त्या म्हणाल्या होत्या.