सुदैवाने आम्ही वाचलो नाहीतर श्रद्धांजलीचां कार्यक्रम घ्यावा लागला असता - अजित पवार
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी आज एका कार्यक्रमात बोलत असताना महत्वाची माहिती दिली. काल एका रूग्णालयाच्या उद्घाटनासाठी अजित पवार गेले होते. त्यावेळी तिसऱ्या मजल्याहून चौथ्या मजल्यावर लिफ्टने जात असताना अचानक लाईट गेली. त्यामुळे चौथ्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली आली. याच प्रसंगाची माहिती त्यांनी आज बारामतीमध्ये बोलत असताना दिली.
काय म्हणाले अजित पवार?
काल दिवसभरात मी दोन रूग्णालयांचं उद्घाटन केलं. त्यातील दुसऱ्या रूग्णालयाच्या उद्घाटनानंतर आम्ही चौथ्या मजल्यावर जात होतो. परंतु, तिसऱ्या मजल्यावर लिफ्ट थांबली. तेथून लिफ्ट थेट खाली आली. माझ्यासोबत एक डॉक्टर आणि एक सुरक्षा रक्षक देखील होते. या घटनेनंतर लिफ्टचा दरवाजा तोडून आम्हाला बाहेर काढण्यात आले. सुदैवाने आम्ही वाचलो नाहीतर आजच श्रद्धांजलीचां कार्यक्रम घ्यावा लागला असता. असे अजित पवार यावेळी म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, काल माझ्या वडिलांची पुण्यतिथी होती. त्यामुळं घरात कोणालाच सांगितले नाही. माध्यमांना देखील काल याबाबतची माहिती मी दिली नाही. आपण आपली काळजी घेतली पाहिजे. तुमच्या सर्वांच्या आर्शीवादाने मला काही झालं नाही. अशा घटना घडत असतात. या घटनेनंतर काही न झाल्याचं दाखवून मी भाषण केलं आणि घरी परतो, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.