पुलवामा हल्ल्याबाबत माजी राज्यपाल मलिक यांचा गौप्यस्फोट; छगन भुजबळ म्हणाले, मलिक हे भाजप...
जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी मोदी सरकारच्या हलगर्जीपणामुळे पुलवामा सारखा मोठा हल्ला घडून आला, असा गंभीर आरोप केला आहे. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या या दाव्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. यावरूनच आता विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत. तर दुसरीकडे राज्यात देखील यावरून वातावरण तापले आहे. यावरच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाष्य केले.
त्या यंत्रणांनी हा तपास केला पाहिजे
पुलवामा हल्ल्याबाबत जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत बोलताना भुजबळ म्हणाले की, सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत जो गौप्यस्फोट केला आहे, याची शहानिशा करणे अत्यावश्यक आहे, मलिक हे भाजपमध्येच होते. त्यामुळे त्यांना यासंदर्भात अधिकची माहिती असेल. त्यांनी जी माहिती दिली आहे. त्याची शहानिशा होणे गरजेचे आहे. याबाबतीत जी कोणती तपास यंत्रणा काम करत असेल, त्या यंत्रणांनी हा तपास केला पाहिजे, असे देखील मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पुढे त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यावर देखील भाष्य केले. ते म्हणाले,'मुंबई महानगरपालिका ही सगळ्यात मोठी पालिका आहे. मुंबई हे देशाचे नाक आहे. यामुळे स्वाभाविकच प्रत्येकाला वाटत असेल की, या पालिकेवर आपली सत्ता राहावी. मुंबईचा महापौर आपल्या पक्षाचा असायला हवा. यासाठीच सगळे प्रयत्नशील असतात' असे भुजबळ म्हणाले.