शरद पवार यांच्या नखाचीही सर देवेंद्र फडणवीस यांना येऊ शकत नाही - रुपाली ठोंबरे
राज्याच्या राजकारणात सध्या प्रचंड खळबळ माजलेली आहे. अशातच विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु असताना राष्ट्रवादी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विखारी टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील या आज नाशिकमध्ये होत्या. त्यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीसांवर ही टीका केली आहे. शरद पवार हे देशाचं व्हिजन असलेले नेते आहेत. त्यांच्या नखाचीही सर देवेंद्र फडणवीस किंवा कोणालाही येऊ शकत नाही. असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
नाशिक दौऱ्यावर असताना रुपाली पाटील म्हणाल्या की, मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतले होते. त्यांना नाशिक शहराचा काय विकास केला. आज नाशिक शहराची काय अवस्था आहे, असा सवाल रुपाली पाटील यांनी केला. शरद पवार यांनी साताऱ्या जिल्ह्याचा काय विकास केला, हे जनतेला विचारा ना. पावसात भिजलं म्हणजे विकास होत नाही, असे ते म्हणतात. मग तुम्ही भिजा तुम्हाला कुणी अडवलंय. शरद पवार हे देशाचं व्हिजन असलेले नेते आहेत. त्यांच्या नखाचीही सर देवेंद्र फडणवीस किंवा कोणालाही येऊ शकत नाही. पण, सातत्यानं शरद पवार यांच्याबद्दल बोलायचं. पवार साहेबांनी काय काम केलं हे जयकुमार गोरे आणि जनतेलाही माहीत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मालकाला खूश करण्यासाठी असं वक्तव्य केलं असेल, असे वक्तव्य त्यांनी यावेळी केले आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, शरद पवार हे काही लोकांना सांगून भिजले नाहीत. भाषण सुरू असताना पावसात भिजले. त्यांनी केलेला विकास. त्यांनी साताऱ्यात केलेल्या कामामुळंच उदयनराजे यांच्या विरोधातील उमेदवार निवडून आला. श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांच्यामुळंच निवडून आले, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. महाविकास आघाडी ही शरद पवार यांच्यामुळं झाली. शरद पवार हे पर्वत आहेत. अशा डोंगरावर उंदीर उड्या मारत असतात. त्यामुळं त्यांना उड्या मारू द्या, अशी विखारी टीका यावेळी त्यांनी केले आहे.