विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून न्यायाची अपेक्षा नाही - संजय राऊत
आमदार अपात्रततेबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांना दोन आठवड्यात उत्तर देण्याची नोटीस बजावली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली होती. परंतु यासंबंधीचा निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचा असल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. त्यामुळे आता 16 आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणी उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांचा अवधी सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे.
याच पार्श्वभूमीवर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, राजकीय पक्षाची झापड बांधून विधानसभा अध्यक्षांचे काम सुरु आहे. विधानसभा अध्यक्षांकडून न्यायाची अपेक्षा नव्हतीच. कोर्टाच्या निर्देशानंतरही अद्याप निर्णय नाही. विधानसभा अध्यक्षांकडून न्यायाची अपेक्षा नाही. असे राऊत म्हणाले.