गुप्तहेर खात्याला बीड हल्याचा सुगावा का लागला नाही? पंकजा मुंडेंनी फडणवीसांच्या खात्यावर व्यक्त केली नाराजी
बीड : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात तापला आहे. अशातच, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड शहरातील जाळपोळ आणि दगडफेक झालेल्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधत बीडच्या जाळपोळीच्या घटनांवर संताप व्यक्त केला आहे. तसेच, पोलिसांचे इंटेलिजन्स कमी पडल्याची खंतही मुंडेंनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा अशी दुर्दैवी घटना घडली. याचा तीव्र निषेध करते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी बीड मधील जाळपोळ आणि हिंसाचार यासह अंतरवली सराटीमधील लाठीचार्जची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केली. तसेच, मराठा समाजाला आरक्षण देताना जन्माने मागास असलेल्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली.
पोलिसांचे इंटेलिजन्स कमी पडल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली. राज्य गुप्तहेर खात्याला बीड हल्याचा सुगावा का लागला नाही, असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. तसेच, ओबीसी-मराठा वाद लावण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे. इतर आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा आम्ही देखील आमरण उपोषण करु. आम्ही रस्त्यावर उतरलो तर अवघड होऊन जाईल, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला आहे.
दरम्यान, मराठा आंदोलनामुळं बीडमध्ये स्फोटक परिस्थिती पाहायला मिळली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या राहत्या बंगल्याला आग लावली होती. तर, राष्ट्रवादी कार्यालय आणि प्रकाश सोळंके यांचेही घर जाळण्यात आले होते.