अजितदादा गोविंदबागेत अनुपस्थित; पार्थ पवारांनी घेतली शरद पवारांची भेट, चर्चांना उधाण
बारामती : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पवार कुटुंबाचा पहिलाच दिवाळी पाडवा गोविंदबागेत पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार उपस्थित राहणार का याची सर्वांनाच उत्सुकता होती. परंतु, आज पहिल्यांदाच अजित पवारांशिवाय दिवाळी पाडवा पार पडला. अजित पवारांनी या कार्यक्रमाला भेट दिली नसल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, अशातच अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे समजत आहे.
दिवाळीनिमित्त संपूर्ण पवार कुटुंबिय बारामतीत आहेत. गोविंदबागेत दरवर्षी पवार कुटुंबिय कार्यकर्त्यांची भेट घेऊन शुभेच्छा स्वीकारतात. मात्र, अजित पवार बारामतीतत असूनही पाडवा कार्यक्रमाला हजेरी लावली नाही. यावर सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांच्या प्रकृती अस्वस्थतेचे कारण दिलं. परंतु, दुसरीकडे अजितदादांनी काटेवाडीतील किल्ल्याची पाहणी केली. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अशातच, आता पार्थ पवारांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. पाडव्यानिमित्त पार्थ पवारांनी गोविंदबागेत येवून शरद पवारांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, महायुतीत सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत अजित पवारांनी निधी वाटपावरुन आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवल्याचंही समजत आहेत. यावरुन विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलं आहे.