उद्धव ठाकरेंसह आनंद दिघेंचा फोटो; पुण्यातील बॅनरची चर्चा

उद्धव ठाकरेंसह आनंद दिघेंचा फोटो; पुण्यातील बॅनरची चर्चा

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाला राजकीय रंग

पुणे : करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे. राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. यंदाच्या मिरवणुकीला राजकीय रंग चढलेला पाहायला मिळत आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचे औचित्य साधून राजकीय नेत्यांनीही गणेश विसर्जन मिरवणुकीस हजेरी लावली आहे. परंतु, यावेळी मात्र शिवसेना पक्षप्रमुख यांच्या पोस्टरची चांगलीच चर्चा होत आहे. या पोस्टरवर उद्धव ठाकरेंच्या डाव्या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. माझा कट्टर शिवसैनिक आनंद दिघे, असे बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य लिहिण्यात आले आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या उजव्या बाजूला आनंद दिघे यांचा फोटो आहे. त्याखाली माझी जात गोत्र धर्म - फक्त शिवसेना हे आनंद दिघेंचे वाक्य लिहिण्यात आले आहे. बॅनरच्या खाली शिवसेना आमदार सचिन अहिर, आदित्य शिरोडकर, पृथ्वीराज सुतार, अनिल बिडलान यांची नावं आहेत.यामुळे या बॅनरची आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करत भाजपसोबत सत्ता स्थापन केली. शिंदेंनी आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठीच शिवसेनेतून बाहेर पडल्याचे सांगितले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चिन्हावरही दावा दाखल केला आहे. खरी शिवसेना कुणाची, हे प्रकरण अद्याप निवडणूक आयोगात प्रलंबित आहे. तर, शिंदे गटाने शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचे सरकार असं म्हणत दसरा मेळावाही हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. अशात, उध्दव ठाकरेंच्या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com