मी अजून दारूला स्पर्शही केलेला नाही! कुणाला पहिल्या धारेची किक बसते तर... अजितदादांची तुफान फटकेबाजी
महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ यांच्या वतीनं 63 व्या द्राक्ष परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाने या परिषदेचा समारोप झाला.
यावेळी अजितदादांनी तुफान फटकेबाजी करत एकच हशा पिकवला. अजित पवार म्हणाले की, जास्त कष्ट घेणारा शेतकरी म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. कारण पीक आल्यापासून ग्राहकाच्या घरात द्राक्ष जाण्यापर्यंत शेतकऱ्याला काळजी घ्यावी लागते. हे सरकार आणखी वाईन्सची दुकानं टाकतंय. मुळात ती वाईन्सची दुकानं आणि द्राक्षपासून निर्माण केली जाणारी वाईन यात फरक आहे. हे तुम्ही जाणून आहात.
काही देशांत तर पाण्याऐवजी वाईन्स पितात. कुणाला पहिल्या धारेची किक बसते तर कुणाला अख्खा खंबा लागतो. पण मी अजून दारूला स्पर्शही केलेला नाही. असे अजित पवार म्हणाले.