Eknath Shinde
Eknath ShindeTeam Lokshahi

तुम्ही अनाथांचे नाथ एकनाथ, असे म्हणत पोलीस निरीक्षकांनी केली दिवाळी बोनसची मागणी

पोलीस निरीक्षक आर आर चव्हाण यांनी लिहले मुख्यमंत्र्यांना पत्र
Published by :
Sagar Pradhan

राज्यात सध्या सर्वत्र सण- उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जात आहे. त्यातच आता दिवाळी सण जवळ आल्यामुळे पोलिसांकडून बोनसची मागणी होत आहे. अशातच धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत असलेल्या एका पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून पोलिसांना दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्याची मागणी केली आहे.

Eknath Shinde
पाकिस्तान समर्थानात घोषणा देणाऱ्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्री शिंदेंचे विधान

पोलीस निरीक्षक आर आर चव्हाण यांनी लिहले की, पोलिसांचे प्रश्न मांडण्यासाठी कोणतीही संघटना नाही. त्यामुळे पोलिसांना कोणी वाली नाही. परिणामी सरकार दरबारी पोलिसांच्या प्रश्नांची, समस्यांची दखल घेतली जात नाही. पोलीस आणि त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर तडजोड करण्याची सवय असते. तशीच तडजोड करुन फक्त एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून द्या, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

“सध्या महाराष्ट्रातील जनता म्हणते की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे दयाळू, अनाथांचा नाथ एकनाथ आहेत. तसंच माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देखील पोलिसांच्या कल्याणाकडे विशेष लक्ष देतात. त्यामुळे आम्हा पोलिसांना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडून 76 दिवस 12 ते 15 तास जास्तीचे कर्तव्ये केल्यामुळे मोबदल्यात दया दाखवून देशातील इतर राज्यांप्रमाणे एक महिन्याचा पगार दिवाळी बोनस म्हणून देण्याची कृपा करावी अशी अपेक्षा आहे,” असे पत्रात पोलीस निरीक्षक राजाभाऊ चव्हाण यांनी लिहिलं आहे.

पोलीस निरीक्षकाने पत्रात काय म्हटलंय?

  • पोलीस वगळून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा असतो. एका वर्षात 52 शनिवार येतात.

  • त्याचबरोबर पोलीस वगळून इतर शासकीय कर्मचाऱ्यांना 24 पगारी सुट्या जास्त मिळतात.

  • असे वर्षातील 52+24 =76 असे 76 दिवस पोलिसांना 12 ते 15 तास जास्त काम करावे लागते. त्यामुळे तुम्ही दिवाळी बोनस म्हणून एक महिन्याचा पगार वाढवून द्यावा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com