कॉंग्रेसने कायम चेपलेच, उद्धव ठाकरेंनी कोणासोबत जायचं ते त्यांनी ठरवावं : आंबेडकर
मुंबई : बंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. तसेच, शिवसेना आणि वंचितच्या युतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यावर अखेर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, इंदू मिलबाबत मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी माझी भेट घेतली होती. या जागेवर बाबासाहेबांच्या नावे इन्स्टिट्यूशन सुरू करण्याची मागणी केली आहे. कॉंग्रेसचे सरकार असतानाही मागणी केली होती. परंतु, पुर्ण झाली नाही. आता मुख्यमंत्र्यांनी इन्स्टिट्यूशन उभे करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. तसेच, पुतळ्याबाबत काही आक्षेप होते. त्याची कल्पनाही त्यांना दिली आहे. त्यासाठी समिती नेमून त्या पुतळ्याची पाहणी ते करतील, अशी माहिती त्यांनी सांगितली आहे.
कोण कोणाला भेटलं की त्याला राजकारणाचा वास येतो असे नाही. आपल्या आपल्या भूमिका सर्वांच्या आहेत. ४० वर्ष मी राजकारणात आहे. कॉंग्रेसने आम्हाला कायम चेपले, शिवसेना आता सोबत येत आहे. कॉंग्रेसच्या सोबत कायमच भांड्याला भांड लागलं आहे. यामुळे उद्धव ठाकरेंनी कोणासोबत जायचं ते त्यांनी ठरवावं, बॉल आता त्यांच्या कोर्टात आहे, असे त्यांनी म्हंटले आहे. मुख्यमंत्र्याची घेतलेली भेट ही प्रत्येकवेळी राजकीय नसते. असं झालचं तर अनेक जणं घरी बसतील, असे संकेतही त्यांनी दिले आहेत.
दरम्यान, महापुरुषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीतर्फे 17 डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. यासंबंधीची माहिती शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांनी सोबत येत दिली होती. या मोर्चात सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांना विचारले असता आम्हाला अद्याप कुठलेही आमंत्रण नाही. आमंत्रण आल्यानंतर विचार करू, असे उत्तर त्यांनी दिले आहे.