देवेंद्रजींनी उद्धव ठाकरेंचे ओझे वाहिले; दरेकरांचा पलटवार
मुंबई : देवेंद्र फडणवीस किती काळ ओझं वाहणार, असा सवाल उध्दव ठाकरेंनी केला होता. याला आज भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्रजी यांनी उद्धव ठाकरे यांचे ओझे वाहिले, असा पलटवार दरेकर यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
प्रवीण दरेकर म्हणाले की, घरकोंबड्यावरून त्यांचे नाव घरबसा झाले आहे. कर्तव्य शून्य उद्धव ठाकरे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या कामामुळे त्यांना वैफल्य आले आहे. त्यांच्या नाका खालून सरकार काढून घेतले. जो बुस्टर डोस लागला आहे, त्यातून ते बाहेर येत नाहीत.
खुर्चीपेक्षा सर्वांचे हित साधले पाहिजे हे धोरण घेऊन देवेंद्र फडणवीस पुढे जात आहेत. तुम्ही एक उपमुख्यमंत्री तुम्ही देऊ शकला नाहीत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तुम्ही कोत्या मनामुळे उपमुख्यमंत्री पद देऊ शकला नाही. कारण त्यावेळी शिंदे यांना हे पद द्यावे लागले असते, असेही त्यांनी म्हंटले आहे.
इंडियन मुजाहिदीनचे पंतप्रधान बोलता, तुम्हाला हे शोभते का? कावळ्याच्या शापाने ढोर कधी मरत नसते. संकुचित विचारांना देशवासिय किंमत देणार नाहीत. आज त्यांना संभाजी ब्रिगेडचा आसरा घ्यावा लागत आहे. शिवसेनेत मराठा नेतृत्व दाबण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. नारायण राणे, रामदास कदम यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. अलीकडच्या काळातील एकनाथ शिंदे, खोतकर, नवले अशी अनेक नावे आहेत.
दरम्यान, आदित्य ठाकरेंनी मुंबईतील टोलनाके बंद करण्याची मागणी केली आहे. यावर प्रवीण दरेकर यांनी हा महसूल सरकारी तिजोरीत जात आहे. मातोश्रीवर जात नाही. हा पैसा जनतेच्या कामासाठी वापरला जाते आहे, अशी टीका आदित्य ठाकरेंवर केली आहे.