एका आठवड्यात आपलं म्हणणं सादर करा, विधानसभा अध्यक्षांनी दिलं शिंदे-ठाकरे गटाला आदेश
शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रत्यक्ष सुनावणी झाली. दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात दाखल झाले होते. याच पार्श्वभूमीवर आता एका आठवड्यात आपलं म्हणणं सादर करा, असे आदेश विधानसभा अध्यक्षांनी शिंदे आणि ठाकरे गटाला दिले आहेत.
विधानसभा अध्यक्षांनी सुरुवातीला देवदत्त कामत यांच्या माध्यमातून ठाकरे गटाच्या आमदारांची बाजू ऐकून घेतली. ठाकरे गटाकडून कागदपत्रे सादर करण्यात आले. मात्र शिंदे गटाकडून कागदपत्र दाखल करण्यात आले नाही. आतापर्यत 2 याचिकांवर सुनावणी पार पडली आहे. ज्यामध्ये ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे या याचिकेवर युक्तिवाद झाला. शिंदे गटाच्या आमदारांनी व्हीप चा उल्लंघन केल्याची याचिका ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली होती.
यामध्ये शिंदे गटाला याचिकेत दाखल केलेली कागदपत्र प्राप्त न झाल्याने बाजू मांडण्यास अडचण निर्माण झाली. त्यामुळे दोन आठवड्याचा वेळ द्यावा अशी विनंती शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली. यामध्ये एक आठवड्याचा वेळ दोन्ही गटांना कागदपत्र एकमेकांना देण्यासाठी व त्यानंतर लेखी म्हणणं मांडण्यासाठी देण्यात आला आहे.