ओबीसी विरुद्ध मराठा वादाचं खापर राज ठाकरेंनी फोडलं राष्ट्रवादीवर; म्हणाले...
ठाणे : ओबीसी विरुद्ध मराठा वादाचं खापर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर फोडलं आहे. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते. दुसऱ्या जातीचा विद्वेष करण्याची वृत्ती राष्ट्रवादीच्या उदयानंतर सुरु झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. तसेच, 25 डिसेंबर रोजी जरांगे काय सॅन्टाक्लॉज बनून येणार आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे.
राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात जातं ही अनेकांना प्रिय आहे, प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान आहे. 1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून जाती-जातींमध्ये धोका निर्माण झाला, स्वतः च्या स्वार्थासाठी हे सर्व घडवलं जात. आमच्या पक्षात जातीवादाला थारा नाही. चांगला माणूस असेल तर मी जात पाहत नाही. राष्ट्रवादीच्या उदयानंतर सुरु झालेल्या द्वेषाचं रुपांतर आता ओबीसी विरुद्ध मराठा वादात झाले आहे, अशी टीका त्यांनी केली
तसेच, कोणत्याही प्रकारचं आरक्षण कधीही मिळणार नाही. हे जरांगे पाटीलच आहेत कि त्यांच्या मागे आणखीन कोण आहे ते येणाऱ्या काळात कळेल, असेही त्यांनी म्हंटले आहे. 25 डिसेंबरला जारंगे काय सॅन्टा क्लॉज बनून येणार आहेत का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तसेच, सध्या ते महाराष्ट्र दौऱ्यावर असून ठिकठिकाणी सभा घेत आहेत. मराठा समाजाच्या पोरांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावं, म्हणून हा लढा सुरू केला आहे, असे जरांगे पाटील म्हणाले आहेत. तसेच, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.