नितीन यांनी आत्मघातकी विचार का केला? छडा लागला पाहिजे : राज ठाकरे
मुंबई : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली आहे. वयाच्या 58 व्या वर्षी त्यांनी आयुष्य संपवलं आहे. नितिन देसाई हे लोकप्रिय कलादिग्दर्शक असण्यासोबत निर्माता दिग्दर्शक आणि अभिनेतेदेखील होते. यावर राजकीय वर्तुळातून शोक व्यक्त केला आहे. अशात, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या बातमीने मन सुन्न झालं असल्याची भावना राज ठाकरेंनी व्यक्त केली.
काय म्हणाले राज ठाकरे?
ज्येष्ठ कलादिगदर्शक आणि माझे स्नेही नितीन देसाई ह्यांच्या आत्महत्येच्या बातमीने मन सुन्न झालं. जवळपास ३० वर्ष हिंदी चित्रपटांच्या जगात एका मराठी कलाकाराने जी भव्यता आणि नजाकत उभी केली त्याला तोड नाही. कला दिग्दर्शकाच्या दृष्टीचा पैस हा मोठाच असावा लागतो आणि असा पैस असलेला माणूस आयुष्यात एका क्षणाला कमकुवत होतो, त्याला आयुष्यात पुढे काहीच दिसेनासं आणि तो इतका टोकाचा निर्णय घेऊ शकतो, हे अनाकलनीय आहे, असे राज ठाकरेंनी म्हंटले आहे.
नितीन हा धीराचा माणूस होता, कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाणारा माणूस होता, त्यामुळे त्याने असा आत्मघातकी विचार का केला असेल? त्याच्यावर ही वेळ कशामुळे आली असेल ह्याचा छडा लागला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. असो, कोणावरही अशी वेळ येऊ नये हीच इच्छा. नितीन देसाईंना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची श्रद्धांजली, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. नितीन देसाई यांची आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाल्याचे समजते. नितीन देसाई यांनी एका कंपनीकडून तब्बल 180 कोटींच कर्ज घेतलं होतं. या कर्जाची पूर्तता करणे देसाई करू शकले नाहीत.