...तर उध्दव ठाकरेंनी तेव्हाच शहांना का नाही थांबवले; राज ठाकरेंचा घणाघात

...तर उध्दव ठाकरेंनी तेव्हाच शहांना का नाही थांबवले; राज ठाकरेंचा घणाघात

राज्यातील राजकीय गोंधळावर राज ठाकरे संतप्त

नागपूर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. यादरम्यान आज त्यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली. महाराष्ट्राच्या राजकारणात मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा आजपर्यंत पाहिलेली नाही. शिवसेनेने मतदारांचा अपमान केला, अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. लोकांनी यांना शासन करावे. जर अपमान होत असेल तर वठणीवर आणलं पाहिजे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

राज ठाकरेंनी आज नागपूरमधील काही सेल व प्रमुख पदे बरखास्त केली आहेत. घट स्थापनेनंतर नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात येईस, असे त्यांनी सांगितले आहे. ते पुढे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणात मी इतका गोंधळ आणि इतकी प्रतारणा आजपर्यंत पाहिलेली नाही. कोण कोणासोबत जात आहे आणि कोण सत्ता स्थापन करत आहे, विरोधी पक्षात कोण बसत आहे हे आजपर्यंतच्या राजकारणात पाहिलेले नाही. तुम्ही युती, आघाडी करुन निवडणुका लढवता, आश्वासनं देता आणि मतदार दोन-दोन तास उभं राहून मतदान करतात.

त्यानंतर निकाल लागल्यावर कोणीतरी सकाळी जाऊन शपथविधी करतं. मग भाजपा-राष्ट्रवादी एकत्र येतात. आणि दोन तासातच फिस्कटतं. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येतात आघाडी करतात. त्यांचीतही नाराजीच्या चर्चा आहेत. नक्की काय चाललेय हे मला कळलेले नाही. शिवसेनेने मतदारांचा अपमान केला, अशी टीका त्यांनी केली आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा आणि मी एका खोलीत बसलो होतो. आम्हाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देणार म्हणाले. पण, 1989 साली झालेल्या बैठकीतच ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्यूला ठरला होता. हा फॉर्म्यूला ठरला असताना निकालानंतर अचानक काय सांगत आहात? ज्यावेळी अमित शहा आणि पंतप्रान मोदींसह भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करत होते. तेव्हाच का नाही त्यांना थांबविले, असा प्रश्नही त्यांनी शिवेसेनेला विचारला आहे.

तर, अशा प्रकारे अपमान केल्यानंतरही लोक जेव्हा त्यांनाच मतदान करतात, तेव्हा आपण केलं ते बरोबर आहे असं त्यांना वाटतं. लोकांनी यांना शासन करावे, निवडणुकीत धक्का देण्याची गरज आहे, तेव्हाच हे सुधारतील. जर अपमान होत असेल तर वठणीवर आणलं पाहिजे, अशा शब्दांत राज ठाकरेंनी मतदारांना आवाहन केले आहे.

Lokshahi
www.lokshahi.com