पंतप्रधान मोदींचा सामना करणं हे काय येड्या गबाळ्यांचं काम नाही; आठवलेंचा उध्दव ठाकरेंवर निशाणा
विकास मिरगणे | मुंबई : 2024 च्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे पंतप्रधान पदाचा चेहरा असतील, असा मोठा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकशाहीवर केला आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणत असतील तर त्यांनी प्रयत्न करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करणं हे काय येड्या गबाळ्यांचं काम नाही, असा निशाणा त्यांनी साधला आहे.
आपल्या देशात पंधरा-वीस पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत. संजय राऊत म्हणत असतील तर त्यांनी प्रयत्न करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सामना करणं हे काय येड्या गबाळ्यांचं काम नाही. प्रत्येक पक्षामध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 2024 चे पंतप्रधान राहणार आहेत त्याबद्दल आम्हाला चिंता अजिबात नाही आम्ही देशाचा विकास केलाय लोकांचे प्रश्न सोडवले. उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदासाठी सक्षम नाहीत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पद त्यांना संभाळता आलं नाही त्यामुळे कोणीही उठून पंतप्रधान पदाची भाषा वापरणे योग्य नाही, अशी जोरदार टीका सामदास आठावले यांनी ठाकरे गटावर केली आहे.
सरकारविरोधात बोलाल तर जीवे मारण्याचा प्रयत्न होतो, असे विधान अशोक चव्हाण यांनी केले होते. याबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, सरकार विरोधात चोर, गद्दार अशी भाषा वापरली जाते आम्ही कोणाचं तोंड बंद केलेलं नाही. जीवाचं संरक्षण करणारे आमचे सरकार आहे. त्यामुळे अशोक चव्हाण जे बोलताय ते योग्य नाही, असे त्यांनी म्हंटले आहे.
कसब्याच्या निवडणुकीवरून हवा बदलली असे अजिबात म्हणता येणार नाही. काँग्रेसला तिथे विजय मिळालाय. मात्र, त्या ठिकाणी केवळ 11000 मतांचा फरक आहे. त्या ठिकाणी आम्ही आत्मपरीक्षण करतो आहोत. एक सीट आली म्हणून हरवून जाता कामा नये. पुढे येणाऱ्या कर्नाटक राजस्थानच्या निवडणुकांमध्ये भाजपाला चांगले यश मिळेल त्यामुळे हवामान बदलतय या शरद पवार यांच्या मताशी मी सहमत नाही, असेही आठवलेंनी सांगितले आहे.
दरम्यान, नाव कोणाला द्यायचं आणि सिम्बॉल कोणाला द्यायचं हा अधिकार निवडणूक आयोगाचा आहे. सुप्रीम कोर्टाकडून देखील इलेक्शन कमिशन च्या निर्णयाला पाठिंबा दिला जाणार आहे. 75 टक्के लोक एकनाथ शिंदे यांच्या बाजूला होते. निवडणूक आयोगाला तो निर्णय लोकशाही पद्धतीने घ्यावा लागलेला आहे. एकनाथ शिंदे यांना दिलेला निर्णय योग्य आहे, असेदेखील त्यांनी म्हंटले आहे.