नवनीत राणांनी निवडणूक कमळावर लढावी; बावनकुळेंच्या विधानावर रवी राणांची प्रतिक्रिया, म्हणाले...
अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी निवडणूक कमळावर लढावी, असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. यामुळे नवनीत राणा भाजपमधून लढणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर आता रवी राणा यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांना मी धन्यवाद देतो, असे रवी राणा यांनी म्हंटले आहे.
रवी राणा म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांना मी धन्यवाद देतो. बावनकुळे यांना वाटतं की नवनीत राणा यांनी भाजपवर लढावं. आम्ही देवेंद्र फडणवीस व केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत. तर एनडीएचा आम्ही सुद्धा घटक आहोत. देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान मोदी हे नवनीत राणा राणा आशीर्वाद देतील. ते नवनीत राणा यांना पाठिंबा देतील, असे त्यांनी म्हंटले आहे. तर, आम्ही आघाडी धर्माचं पालन केलं, तसेच भाजपही आघाडी धर्माचं पालन करतील. नवनीत राणा या लोकसभा निवडणुकीत विजयी होतील, असाही विश्वास रवी राणा यांनी व्यक्त केला आहे.
काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?
नवनीत राणा या एनडीएच्या घटक आहेत. त्यामुळे त्यांनी कमळावर लढणं उत्तम आहे ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यामुळे कमळावर लढावं, त्यांनी नकार दिला तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कमळावर निवडणूक लढली तर त्या आणखी जास्त मताने विजयी होतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.