जे निवडून आले ते आपलेच; निकालानंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया
बीड : राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. यात कर्जत-जामखेड या मतदार संघात रोहित पवार यांना धक्का बसला आहे. तर, भाजप आमदार राम शिंदेंनी वर्चस्व कायम राखले आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जे निवडून आले ते आपलेच असल्याचे रोहित पवार यांनी म्हंटले आहे.
ग्रामपंचायतीच्या बाबतीत या पक्षाची सत्ता आली आणि त्या पक्षाची सत्ता आली असं बोलून चालत नाही. मी माझ्या मतदारसंघात ग्रामपंचायतीत लक्ष घातलं नव्हतं. जे निवडून आले ते आपलेच आहेत. जे पडलेले आहेत ते देखील आपलेच आहेत. कारण एकत्रित पद्धतीने ग्रामपंचायती लढल्या जातात. ठराविक ठिकाणी भाजप विरुद्ध दुसरा पक्ष किंवा इतर पक्ष असं होत असतं.
यावरून लोकसभा आणि विधानसभाची बांधणी करत असतील तर त्यांना मी शुभेच्छा देतो, असं रोहित पवार यांनी म्हंटले आहे. बीडमध्ये त्यांनी राष्ट्रवादी भवन इथे झालेल्या नुकसानीची पाहणी केली आहे.
दरम्यान, कर्जत-जामखेड मतदार संघाचा संपूर्ण निकाल हाती आला असून 9 जागांपैकी पाच ग्रामपंचायतींवर राम शिंदेंनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला आहे. तर, शरद पवार गटाला 1 आणि अजित पवार गटाला 1 जागा मिळाली आहे. तसेच स्थानिक आघाडीला 1 जागा मिळाली आहे. हा निकाल पाहता रोहित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा मानण्यात येत आहे.