राज्यपालांचा अपमान करणं योग्य नाही, राज्यपालांच्या विधानावर आठवलेंचे प्रतिक्रिया
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राज्यात सर्वत्र प्रचंड गदारोळ सुरु आहे. या विधानांचा प्रचंड निषेध दर्शवला जात आहे. अशातच आता यावरून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. राज्यपालांच्या विधानाशी आम्ही सहमत नसून त्यांनी अशी विधाने टाळली पाहिजे, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले. पिंपरी-चिंचवडमध्ये असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना ते असे म्हणाले.
काय म्हणाले रामदास आठवले?
माध्यमांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज जुन्या काळातील प्रेरणास्थान होतेच, आजही ते सर्वांचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. त्यामुळे राज्यपालांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. मात्र, त्यांच्या विरोधात जे आंदोलन सुरू आहे, ते राजकीय आहे. राज्यपालांसारख्या व्यक्तीचा अशा प्रकारे अपमान करणं योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.
पुढे ते म्हणाले की, “राज्यपालांनी सांगितलं आहे की ते आता कमी बोलणार आहेत. त्यामुळे आता त्यांनी अशा प्रकारची व्यक्तव्य टाळली पाहिजे असं आमचं मत आहे. अशा प्रकारे कोणाच्या भावना दुखावणारे व्यक्तव्य राज्यपाल म्हणून करू नये”, असेही रामदास आठवले म्हणाले.