मुंगळे डसू लागल्यावर भाजपामध्ये शिरणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की...; सामनातून हल्लाबोल

मुंगळे डसू लागल्यावर भाजपामध्ये शिरणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की...; सामनातून हल्लाबोल

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.
Published by  :
Siddhi Naringrekar

अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचा सामनाचा अग्रलेखातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

सामनातून म्हटले आहे की, विकासासाठी आपण शिंदे-फडणवीस यांच्याबरोबर गेल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. हा दावा पोकळ आणि बिनबुडाचा आहे. अजित पवार यांना विकासाची हौस आहे हे मान्य, पण गेली अनेक वर्षे सत्तेत असताना त्यांनी विकासाचे असे कोणते इमले रचले? जे आमदार आपल्या गटात नाहीत त्यांना त्यांच्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक फुटकी कवडी द्यायची नाही अशी बनवाबनवी राज्याचे मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री करीत आहेत. आता हा विकास आहे असे जर अजित पवारांना वाटत असेल तर ते शाहू , फुले , आंबेडकरांच्या विचारांचा घोर अपमान करीत आहेत .

तसेच शिवसेना ही जशी मिंधे गटाची नाही तसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही अजित पवार गटाचा नाही. शिवसेना फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचाच आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा शरद पवार यांचाच पक्ष राहू शकतो. मात्र भाजपने त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी ‘घाव’ घातला म्हणून तुमची ही सत्तेची ‘हाव’ पूर्ण झाली आहे, हे या पक्षांवर बेगडी दावा सांगणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. तेव्हा आपल्याला सत्तेची हाव नाही वगैरे अजित पवारांचे बोलणे झूठ आहे. शिंदे व अजित पवार हे कोणत्याही उदात्त विचाराने पक्षाबाहेर पडलेले नाहीत तर ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय वगैरेंच्या चौकश्या नकोत या भयाने त्यांनी गुडघे टेकले हे बारामतीत त्यांच्यावर फुले उधळणारी जनताही जाणते.

बारामतीत जाऊन अजितदादा असेही म्हणाले की, ”मला सत्तेची हाव नाही. मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही. शाहू, फुले, आंबेडकर अशा महान विभूतींचे विचार आपण पुढे नेणार आहोत”. मुळात महाराष्ट्रासह देशात धार्मिक तणाव निर्माण करून दंगली घडविणे हा भाजपचा एककलमी कार्यक्रम आहे. लोकांना धर्माच्या, जातीच्या नावावर झुंजवायचे हा काही शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार नव्हता. सत्तेच्या मस्तवालपणातून जमा केलेल्या गडगंज इस्टेटीवर ईडी , इन्कम टॅक्सचे मुंगळे चढले . ते मुंगळे डसू लागल्यावर भाजपच्या गोठय़ात शिरणाऱ्यांनी एक लक्षात ठेवले पाहिजे की , 2024 मध्ये नक्कीच सत्ताबदल होत आहे व शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे ” आज कपाटात गेलेल्या फाइली पुन्हा टेबलावर येतील .” महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या बेइमानांना तेव्हा दया नसेल ! सत्तेची भूक तोपर्यंत सगळय़ांनीच शमवून घ्यावी हाच सगळ्यांना प्रेमाचा सल्ला! असे म्हणत सामनातून टीका करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com