तुमची पोपटपंची बंद करा,लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले ते सांगा; सामनातून हल्लाबोल

तुमची पोपटपंची बंद करा,लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले ते सांगा; सामनातून हल्लाबोल

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
Published by  :
Siddhi Naringrekar

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणी करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचे पडसाद राज्यभरात उमटत असून राज्याचे राजकारणही चांगलेच तापले आहे. याठिकाणी राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाच्या सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. अग्रलेखातून म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असतानाच जालन्यात पेटलेल्या मराठा आंदोलनाचा भडका जास्तच वाढला आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर मनोज जरांगे-पाटील उपोषणास बसले व शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर शिंदे-फडणवीस-पवारांच्या सरकारने अमानुष लाठीमार केला, बंदुका चालवल्या. शिंदे-फडणवीस-अजित पवार सोडून सगळेच नेते जरांगे-पाटलांच्या गावात जाऊन आले. मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, मराठा समाजाच्या वेदनांची मलापूर्णजाणआहे. मुख्यमंत्री हे खोटे बोलण्यात वस्ताद आहेत. आधी तुमची पोपटपंची बंद करा व जालन्यातील मराठा आंदोलकांवर गोळय़ा चालवण्याचे, अमानुष लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले ते सांगा . तर तुम्ही खरे मराठा! एका तोंडाने आंदोलकांवर लाठ्या-गोळ्या चालवायचे आदेश द्यायचे व दुसऱ्या तोंडाने मला तुमच्या वेदनांची जाण आहे , असे सांगायचे हे ढोंग आहे . जालन्याच्या आंतरवाली गावातील मनोज जरांगे -पाटलांनी शिंदे-फडणवीस-पवार या दुतोंडी सरकारच्या ढोंगाचा बुरखा फाडला आहे!

मराठा आरक्षणासाठी सरकार काय काय करते आहे ते त्यांनी सांगितले, पण जरांगे-पाटील यांनी खिशातून बंदुकीची गोळी काढून महाजनांच्या हाती दिली व सांगितले, ”तुमच्या सरकारने मराठा आरक्षणासाठी हे केले. आम्ही आरक्षण मागितले. सरकारने बंदुकीची गोळी दिली.” तसेच ”मराठा आरक्षणाचा सरकारी आदेश म्हणजे ‘जीआर’ हातात पडत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही,” असा दम जरांगे-पाटलांनी भरला. जालन्याच्या आंतरवाली गावात एक सर्वसामान्य कार्यकर्ता जिद्दीने त्याच्या समाजासाठी उपोषणाला बसला आहे. त्याने प्राणपणास लावले आहेत व खोकेवाल्या सरकारपुढे तो झुकायला तयार नाही. सारवासारवी म्हणून सरकारने आता जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचा बळी घेतला आहे. मात्र मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांचा आदेश असल्याशिवाय मराठा आंदोलकांवर निर्घृण हल्ला होऊच शकत नाही. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी ज्यांचे आदेश पाळले त्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना शासन करणार का? नागपूरच्या चाणक्यांचे जामनेरी चाणक्य गिरीश महाजन हे मनोज जरांगे-पाटलांना भेटायला गेले.

दिल्ली विधानसभेवर ताबा मिळविण्यासाठी मोदी सरकारने एका रात्रीत अध्यादेश आणला. संसदेत घटना दुरुस्ती करून दिल्लीतील लोकशाही मोडून केजरीवाल सरकारचे सर्व अधिकार हातात घेतले. मग मराठा आरक्षणासाठीही केंद्राने आरक्षणाची मर्यादा वाढवून प्रश्न सोडवायला हवा. असे सामनातून म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com