लाल किल्ल्यावरून मोदी यांचे हे शेवटचे भाषण आहे, ही भविष्यवाणी खरे ठरो; सामनातून टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15ऑगस्टला लाल किल्ल्यावरून भाषण केलं. मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या. याच पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे.
सामनातून म्हटले आहे की, लाल किल्ल्यावर 2024 चा तिरंगा मोदी फडकवणार नाहीत असे एकंदरीत वातावरण आहे. लालू यादव यांनी त्यांचे मत स्पष्टपणे मांडल्यामुळे त्यांच्या घरावर ‘ईडी’च्या धाडी नव्याने पडू शकतील व एखाद्या खोटय़ा गुन्ह्यात अडकवून यादव कुटुंबाचा छळ केला जाईल. गेल्या दहा वर्षांपासून आपल्या देशात यापेक्षा वेगळे काहीच घडत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी लोकशाहीच्या पिपाण्या वाजवणे, तिरंगा फडकवून भाषणे देणे हा एक उपचार झाला आहे. मोदी यांनी जनतेला असे आश्वासन दिले की, ‘मला पुन्हा एक संधी द्या. मी तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करेऩ’ मात्र यापूर्वी 2014 आणि 2019 मध्ये दिलेल्या आश्वासनांचे व जनतेला दाखविलेल्या स्वप्नांचे काय झाले? ते आधी सांगा. पंतप्रधान मोदी 90 कोटी लोकांना फुकट रेशन देतात. त्या फुकट रेशनसाठी जनता भिकेचा कटोरा घेऊन रांगेत व रांगत उभी राहते. हेच विकास आणि प्रगतीचे लक्षण मानायचे काय? लोकांना असे पंगू करणे हे स्वातंत्र्य नाही. असे सामनातून म्हटले आहे.
तसेच देशाचा 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला, पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय संबोधन केले, त्यात नवे काय होते? तेच, तेच आणि तेच. मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीस दहा वर्षे होत आली व लाल किल्ल्यावरचे त्यांचे हे नववे भाषण.घराणेशाहीचे राज्य असताना लोक इतके भयग्रस्त कधीच नव्हते . आज लाल किल्लाही भयग्रस्त व अस्वस्थ असेल . त्यामुळे ‘ लाल किल्ल्यावरून मोदी यांचे हे शेवटचे भाषण आहे ‘ ही लालू यादवांची भविष्यवाणी ही 140 कोटी लोकांची , स्वातंत्र्य संग्रामातील शहीद आत्म्यांची शापवाणी ठरू शकेल! श्री. लालू यादव जे बोलले ते खरे ठरो, लालू यादवांच्या तोंडात साखर पडो अशा प्रकारच्या भावना देशाच्या गावागावांत आहेत. असे म्हणत सामनातून जोरदार टीका करण्यात आली आहे.