...पण हे सगळे कलियुगातील ‘संत'; सामनातून हल्लाबोल
अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला समर्थन दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचा अग्रलेख सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.
सामनातून म्हटले आहे की, अजित पवार व त्यांचे महामंडळ चौकश्यांचा ससेमिरा टाळण्यासाठी भाजपचरणी गेले. अन्याय, नैतिकता, मोदीप्रेम वगैरे सगळे झूठ आहे. अर्थात अजित पवार त्यांच्या या कृतीमुळे ‘दादा’ राहिले नाहीत. कवडीमोल दराने कारखाना मिळाला व पुणे जिल्हा बँकेकडून पुन्हा 826 कोटींचे कर्ज घेतले. त्यावेळी बँकेच्या संचालक मंडळावर अजित पवार होते. हा पैसा साखर कारखान्याच्या कामासाठीच वापरायला हवा होता, पण ‘ईडी’च्या आरोपपत्रानुसार तसे दिसत नाही. अजित पवार व त्यांचे ‘संत’ महामंडळ भारतीय जनता पक्षाच्या चरणी लीन झाले. असे सामनातून म्हटले आहे.
तसेच विरोधी पक्षनेत्यानेच अशा प्रकारे राजकीय शीर्षासन करावे हे संसदीय लोकशाहीवरील विश्वास उडविणारे प्रकरण आहे. सत्तेचा पिसारा फुलवून आज हे मोर भाजपच्या अंगणात नाचत-बागडत आहेत, पण भाजपच्या अंगणात नाचणाऱ्यांचा नंतर थांग लागत नाही, हा इतिहास आहे.दुसरा एखादा कोणी या प्रकरणात असता तर श्री. फडणवीस यांच्या शब्दात तो ‘चक्की पिसिंग’ला गेला असता, पण आता अजित पवार, मुश्रीफ, भुजबळ, वळसे हे ‘चक्की पिसिंग’चे महात्मे शुद्ध होऊन ‘पवित्र’ भिंतीवर बसले व उडत राजभवनावर गेले. तेथे ‘रेडे’ कापून मंत्र म्हणणाऱ्यांच्या पंगतीला बसले. म्हणजे रेड्यांचे महत्त्व येथे देखील आहे.
आमचा प्रश्न पुन्हा तोच आणि तोच आहे. अजित पवार यांच्यावरील सर्व आरोप खोटे की खरे? व खोटे असतील तर ‘ईडी’च्या बेताल वर्तणुकीवर काय कारवाई करणार? एकंदरीत सगळाच घोटाळा आहे. पण संत, महात्मे व युगपुरुषांच्या चुका शोधायच्या नसतात. त्यांचे गुन्हे म्हणजे प्रसादच असतो. महाराष्ट्राला सध्या तो प्रसाद मिळाला आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहेच, पण हे सगळे कलियुगातील ‘संत’ आहेत. त्यांच्या पायाचे तीर्थ सध्या भाजप प्राशन करीत आहे. महाराष्ट्रासाठी ते विष आहे! असे म्हणत सामनातून हल्लाबोल करण्यात आला आहे.