...तर तंगड्या तोडू; संजय गायकवाड यांची अधिकांऱ्यांना धमकी

...तर तंगड्या तोडू; संजय गायकवाड यांची अधिकांऱ्यांना धमकी

आमदार संजय गायकवाड हे आपल्या निर्भीड वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असतात नव्हे तर अनेकदा त्यांचे विधान वादग्रस्त देखील ठरलेले आहेत.

संदीप शुक्ला | बुलढाणा : आमदार संजय गायकवाड हे आपल्या निर्भीड वक्तव्यावरून नेहमीच चर्चेत असतात नव्हे तर अनेकदा त्यांचे विधान वादग्रस्त देखील ठरलेले आहेत. आता पुन्हा एकदा मेंढपाळ बांधवांच्या मोर्चाला संबोधित करताना त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना थेट धमकीच दिली आहे.

मेंढपाळ बांधवांना मेंढ्या चारण्यासाठी जमीन शिल्लक नसल्याने वनविभागाने मेंढ्या चराईसाठी जमीन उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्या घेऊन ऑल इंडिया नवयुवक मल्हार सेनेच्या वतीने मेंढ्या घेऊन मेंढपाळ बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. यामध्ये शेकडो मेंढपाळ बांधव-भगिनी सहभागी झाले होते.

दरम्यान, वनविभागाच्या जमिनीवर मेंढ्या चारल्यामुळे अनेक मेंढपाळांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आली, अशा तक्रारी यावेळी मेंढपाळ बांधवांनी मांडल्या.

याच मेंढपाळ बांधवांच्या मोर्चाला संबोधित करताना आमदार संजय गायकवाड यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्याला सज्जड दम भरला. आमच्या मेंढपाळाला जर हात लावाल तर माझे कार्यकर्ते तंगड तोडून परत येतील. वन अधिकाऱ्यांना जास्तच माज आला असेल तर आमच्यात माज उतरवण्याची देखील ताकद आहे. आणि अशा माजलेल्या सांडांची मस्ती उतरवण्याचे काम आपल्याला पुढच्या काळात करायचे आहे, असेही ते यावेळी आपल्या भाषणातून मेंढपाळ बांधवांना बोलत होते. संजय गायकवाडांच्या या विधानामुळे चर्चांना ऊत आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com