PM Modi | Sanjay Raut
PM Modi | Sanjay RautTeam Lokshahi

'लोकशाहीच्या मुखवटय़ाआड पंतप्रधान मोदी हुकूमशाहीच चालवताहेत'

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचा सामना रोखठाकमधून मोदी सरकारवर घणाघात

मुंबई : देशातील निवडणुका म्हणजे फक्त एक देखावाच उरला आहे. ईव्हीएम हॅक करून निवडणुका जिंकणाऱ्यांच्या हाती आज देशाची सूत्रे आहेत. विरोधकांवर पाळत ठेवली जात आहे. त्यांना अडकवले जात आहे व त्यासाठी परदेशी कंपन्यांचा वापर होतो, असा घणाघात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामना रोखठाकमधून मोदी सरकारवर केला आहे ‘गार्डियन’ने अनेक स्फोट केले. 2023च्या मध्यास वॉशिंग्टनमधून आणखी स्फोट होतील व पंतप्रधान मोदींना जावे लागेल, असे भाकीत डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केले आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.

PM Modi | Sanjay Raut
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, लोकशाहीचा कुठेही अपमान...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे आज सर्वत्र बोलले जाते. वृत्तपत्रांनीच त्यांची प्रतिमा मोठी केली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी त्यांना जगाचे सर्वोच्च नेते करून टाकले, पण जगातील प्रसिद्धी माध्यमांत अदानी प्रकरणानंतर मोदी यांची पत घसरली. त्यात ‘बीबीसी’वरील छाप्यानंतर चित्र बरेच बदलले आहे. मोदी यांची लोकप्रियता व एकंदरीत राज्यकारभार हा फुगा आहे. लोकशाहीच्या मुखवटय़ाआड ते हुकूमशाहीच चालवत आहेत यावर जगात चर्चा सुरू झाली. मोदी यांचे आतापर्यंतचे विजय व लोकप्रियता हा एक प्रकारचा दहशतवाद आणि हुकूमशाहीच होती. यावर जागतिक माध्यमांत चर्चा सुरू झाली आहे. ‘द गार्डियन’च्या खास वृत्तानुसार भारतातील अनेक प्रकरणांवरचा पडदा उघडताना दिसत आहे.

इस्रायलच्या कंपनीस ‘कंत्राट’ देणारे व त्यांना अर्थपुरवठा करणारे याच देशातले प्रमुख उद्योगपती आहेत. ‘पेगॅसस’ या हेरगिरी करणाऱया उपकरणाचा वापर आजही आपल्या देशात सुरू आहे व या पेगॅससचे जनक इस्रायल आहे. विरोधी पक्षाने ‘पेगॅसस’चा विषय अधांतरी सोडला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, प्रमुख राजकीय नेते व उद्योगपतींवर आजही ‘पेगॅसस’च्या माध्यमातून पाळत ठेवली जात आहे.

संघ परिवाराशी संबंधित भाजप नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी एक मागणी पुन्हा केली. ते म्हणतात, ‘‘पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांना तात्काळ पदावरून हटवले पाहिजे. त्यांनी अनेकदा मूर्ख बनवले आहे. पेगॅसस टेलिफोन टॅपिंग हे त्याचे उत्तम उदाहरण. वॉशिंग्टनमधून डोवाल यांचे आणखी एक भयंकर प्रकरण लवकरच उघड होणार आहे. मोदी यांनी वेळीच पावले उचलली नाहीत तर 2023 च्या मध्यास मोदी यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागेल!’’

पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियतेचे ‘सूत्र’ ईव्हीएम व इस्रायली हेरगिरी कंपनीच्या कारवाईत दडले आहे. देशातील बहुतेक निवडणुका गेल्या सात-आठ वर्षांपासून ‘निष्पक्ष’ वातावरणात होऊ शकल्या नाहीत. देशात महागाई, बेरोजगारी, असंतोषाचा भडका उडाला असताना ‘‘आम्ही लोकसभेच्या 400 जागा जिंकू,’’ असा दावा भाजपचे वरिष्ठ नेते करतात, याचा अर्थ आता समजून घेतला पाहिजे. काँग्रेसच्या काळात मतदान केंद्रे ताब्यात घेतली जात होती असा आरोप करणारे आज मतदान प्रक्रिया ताब्यात घेण्यासाठी इस्रायली कंपन्यांचा वापर करीत असतील तर लोकशाही हा फक्त देखावाच आहे.

इस्रायली डिटेक्टिव्ह कंपनी ‘टीम जॉर्ज’ हीच मोदी व भाजप सरकारची सूत्रधार आहे. ‘द गार्डियन’ने त्याची पोलखोल केली. हिंडेनबर्ग ते टीम जॉर्ज म्हणजेच ‘टीम मोदी’ आहे काय, हे आता उघड होऊ द्या. देशातील सर्व निवडणूक मतदान पत्रिकेवर म्हणजे बॅलेट पेपरवरच व्हायला हव्यात, ही मागणी पुन्हा पुढे यायला हवी! नागपूरसह पाच विधान परिषदांच्या निवडणुका मतपत्रिकेवर झाल्या, त्याचा परिणाम सगळय़ांनी अनुभवला! डॉ. स्वामी लवकरच एक नवा स्फोट घडवतील, तो वॉशिंग्टनमार्गे. देश वाट पाहत आहे, असेही संजय राऊत म्हंटले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com