बोम्मई रोज महाराष्ट्राच्या कानफडात मारतात अन् मुख्यमंत्री गाल चोळत...; संजय राऊतांचा घणाघात

बोम्मई रोज महाराष्ट्राच्या कानफडात मारतात अन् मुख्यमंत्री गाल चोळत...; संजय राऊतांचा घणाघात

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या विधानावरुन संजय राऊतांचा शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल

मुंबई : राज्याची एक इंचही जमीन देणार नाही, अशी भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी कर्नाटक विधानसभेत घेतली. सीमा वादावर झालेल्या चर्चेदरम्यान राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने ठराव पास करण्याची सूचना केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. बोम्मई रोज उठतात आणि महाराष्ट्राच्या कानफडात मारतात आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात. हे महाराष्ट्राचे दुर्देव आहे, अशा शब्दात राऊतांनी टीका केली आहे.

बोम्मई रोज महाराष्ट्राच्या कानफडात मारतात अन् मुख्यमंत्री गाल चोळत...; संजय राऊतांचा घणाघात
सीमाभागातील एक-एक इंच जागा महाराष्ट्रामध्ये आली पाहिजे, ठराव मांडणार : अजित पवार

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे क्रांतिकारक मुख्यमंत्र्यांचे काय म्हणणे आहे ते समजून घ्यावे लागेल. कारण त्यांनी तीन महिन्यापुर्वी महाराष्ट्रात जी क्रांती केली. त्या क्रांतीचाच हा एक भाग कर्नाटकात दिसत आहे. बोम्मई काय म्हणतात त्यापेक्षा महाराष्ट्र काय म्हणतो हे महत्वाचे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सातत्याने यावर बोटचेपी भूमिका घेत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केली म्हणजे काय केली. एवढे करुनही बोम्मई अशी भाषा वापरत आहेत यावर सराकार काही उत्तर देणार आहे की नाही.

एक इंच जागा देणार नाही आणि महाराष्ट्रातील जागांवरचा हक्क सोडणार नाही. इतकी बेअब्रु महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यांनी कधी केली नव्हती. सीमाप्रश्न जरी जुना असला तरी एकमेकांच्या राज्याचा आदर ठेवून हा संघर्ष सुरु होता. दोन्ही राज्य एकाच देशाचे घटक आहेत. तरीही बोम्मई रोज उठतात आणि महाराष्ट्राच्या कानफडात मारतात आणि मुख्यमंत्री गाल चोळत विधानसभेत जातात हे दुर्देव आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.

बोम्मई रोज महाराष्ट्राच्या कानफडात मारतात अन् मुख्यमंत्री गाल चोळत...; संजय राऊतांचा घणाघात
गांधी जुन्या तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता; अमृता फडणवीस यांचे विधान

तुम्ही म्हणता आम्ही सीमाप्रश्नी लाठ्या खाल्या आहेत तर दाखवा. तो जोर, जोश दाखवा. तुम्ही जर भूमिका घेत नसाल तर तुम्ही मुख्यमंत्री पदावर बसण्यासाठी योग्य नाही. तुम्ही भुखंडाच्या आरोपांवर तासभर उत्तर देता इतर गोष्टी काढतात. मग, सीमाप्रश्नासंदर्भात बाजूचा राज्याचा मुख्यमंत्री रोज आपला अपमान करतोय. तरी तुम्ही बोलत का नाही. काय तुमची अडचण आहे. सरकारच्या तोंडात कोणी बोळा कोंबलाय, असे प्रश्न त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला विचारला आहे. तुम्ही ग्रामपंचायत जिंकल्याचे आकडे दाखवतात. पण, गावे चालली आहेत ती पाहा. इतके हलबल, विकलांग सरकार कधीच झाले नव्हते, अशीही टीका संजय राऊतांनी केला आहे.

जशात तसे उत्तर देण्याची गरज असताना राज्य सरकार लेचापेचा पध्दतीने वागते. कोणाला तरी घाबरले आहे असे वाटतंय. पण, सरकारने या प्रश्नावर जर निर्णय घेतला तर तुमच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहील. इथे राजकारण नाहीये. कोणत्याही पक्षाचा मुख्यमंत्री असो सीमाप्रश्नी आम्ही सर्व एक आहे. पण, तुम्ही भूमिकाच घ्यायला तयार नाही, असेही राऊतांनी म्हंटले आहे.

दरम्यान, नागपूर भूखंड घोटाळ्यावरुनही संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. हे घटनाबाह्य सरकार आहे. काल जो घोटाळा बाहेर आला तो गंभीर आहे. हायकोर्टाने तुमच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तरी उपमुख्यमंत्री वकीली करत आहेत. यावरुन 110 कोटीमध्ये मांजरी-बोक्याची वाटणी झाली आहे का, असा सवाल त्यांनी विचारला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com