Sanjay Raut : परवडत नसेल तर कांदा खाऊ नका म्हणणारे मंत्री दीडशहाणे
केंद्र सरकारच्या निर्यात धोरणाविरोधात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळं कांदा निर्यात शुल्क वाढीविरोधात सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आले. अशातच, दादा भुसे यांनी नागरिकांना अजब सल्ला दिला आहे. कांद्याचे भाव वाढले आहे तर चार महिने कांदे खाऊ नका, असा सल्ला दादा भुसे यांनी नागरिकांना दिला आहे. या विधानावरुन आता दादा भुसेंवर टीका करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, कांद्यामुळे भारतीय जनता पक्षाचा सरकार गेलं होतं. महाराष्ट्रात सुद्धा आता तीच वेळ आली आहे. हा मस्तवालपणा आहे. हा मस्तवालपणा खोक्यातून निर्माण होतो. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. निर्याती संदर्भात जी महाराष्ट्राची स्थिती आहे म्हणजे असं झालं जर तुम्हाला ब्रेड खाता येत नाही. तर तुम्ही केक खा. सामान्य गृहिणींनी कांद्यापासून वंचित राहू नये असे आमचं म्हणणं आहे. हे दीड शहाणे मंत्री पहिले कृषिमंत्री होते. त्यांना या राज्याची स्थिती माहित आहे का याच्यावरती जनता उत्तर देईल. असे राऊत म्हणाले.