निवडणूक आयोगावरील विश्वास संपला; राऊतांचा घणाघात, ४० बाजारबुणगे...
मुंबई : निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण निशाणी व शिवसेना हे नाव बाळासाहेबांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला मिळाले आहे. निवडणूक आयोगाचा हा निकाल उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य तोडून आता असत्यमेव जयते करावे लागेल. खरेदी विक्री कुठपर्यंत गेली आहे. हे आज स्पष्ट झाले. जो पक्ष बाळासाहेब ठाकरे आणि लाखो शिवसैनिकांनी रक्त आणि बलिदान देऊन उभा केला. तो पक्ष आणि त्याचे चिन्ह ४० बाजारबुणगे विकत घेतात. याची नोंद इतिहासात राहील. आज या देशातल्या निवडणूक आयोगावरचा विश्वास जनतेने गमावला, अशा शब्दात संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रावर सूड घेण्याचा हा प्रयत्न आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर शिवसेना किंवा मराठी माणसाचा अधिकार राहू नये, त्यासाठी फेकलेला हा फास आहे. आमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही. या निर्णयाचा सर्वोच्च न्यायालयात काहीही फायदा होणार नाही. जनता आमच्या सोबत आहे. आम्ही नवीन चिन्ह घेऊन जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि शिवसेनेला पुन्हा उभी करुन दाखवू. या निर्णयाला आम्ही नक्कीच आव्हान देऊ, असेही संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, हिंदुहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचा हा विजय आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी व आम्ही घेतलेल्या निर्णायाशी एकरुप झालेल्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य लाखो शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय मेरीटवरील आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.