मोदीजी, ...आम्ही सरकारला पाठिंबा देऊ; संजय राऊतांचे ट्विट चर्चेत
मुंबई : एक देश एक निवणूक यासंदर्भात केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकार संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यान काही विधेयके मांडू शकते. अशातच, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेलं ट्विट चर्चेत आले आहे.
अनेक मुद्द्यांवर संसदेच्या विशेष अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी ट्विट केले आहे. ते म्हणाले की, चीनने भारताच्या भूमीवर कब्जा केल्याबद्दल आणि नव्याने ताब्यात घेतलेल्या भागाचा नकाशा प्रसिद्ध केल्याबद्दल चीनचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी अमृत कालदरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन बोलावल्याचे ऐकण्यात आले आहे. मोदीजी, तुम्ही कोणतीही भीती न बाळगता संसदेच्या विशेष अधिवेशनात चीनवर चर्चा करा. या चर्चेत आम्ही सरकारला पाठिंबा देऊ, असे विधान राऊतांनी केले आहे.
दरम्यान, चीनच्या मंत्रालयाने गेल्या महिन्यात २८ ऑगस्ट रोजी एक नवीन नकाशा जारी केला होता. यामध्ये भारताचा अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश आपला हिस्सा असल्याचा दावा केला आहे. चीनच्या या निर्णयाला भारताने कडाडून विरोध केला आहे. भारताने म्हटले होते की, अशा पावलांमुळे सीमा विवाद सोडवणे गुंतागुंतीचे होते. परराष्ट्र मंत्रालयानेही चीनचे दावे निराधार असल्याचे सांगत फेटाळले होते. तर, चीनच्या दाव्यावरुन विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले होते.