अरविंद केजरीवालांच्या भेटीनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; ही लोकशाही वाचवण्याची वेळ
मुंबई : आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली आहे. संसदीय लोकशाही यावर आमचा विश्वास आहे. परंतु, दिल्लीत थेट संसदीय लोकशाहीवरच आघात होत आहे, असे टीकास्त्र शरद पवारांनी मोदी सरकारवर सोडले आहे.
संसदीय लोकशाहीवर आमचा विश्वास आहे. लोकशाहीत निवडून आलेल्या राज्य सरकारकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही लोकशाही वाचवण्याची वेळ आहे. सरकार तयार करण्याचा अधिकार व सामान्य जनतेचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी अरविंद केजरीवाल येथे आले आहेत. महाराष्ट्राची जनता ही अरविंद केजरीवाल यांचे समर्थन करेल. राष्ट्रवादी काँग्रेस तर मदच करेलच, असा विश्वास शरद पवारांनी अरविंद केजरीवालांना दिला आहे. निवडून आलेले सरकारचे अधिकार वाचविण्यासाठी हा प्रयत्न आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनीही शरद पवारांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या नागरिकांवर अन्याय सुरु आहे. एक नोटिफिकेशन्स काढून केंद्राने राज्याचे सर्व अधिकार काढून घेतले. ८ वर्षांनतर सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण निर्णय दिल्लीच्या जनतेच्या बाजूने दिला. ८ दिवसांत केंद्राने निर्णय घेत पुन्हा सर्व अधिकार काढून घेतले. आता हे विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजुरीसाठी येईल. त्यावेळी ते नामंजूर करण्याचे आवाहन अरविंद केजरीवालांनी आज शरद पवारांना केले.