...म्हणून बहिष्कार घालण्याचा निर्णय; शरद पवारांनी सांगितले नेमके कारण
मुंबई : नव्या संसदेच्या उदघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. याविरोधात राजकीय वातावरण तापले असून विरोधकांनी उदघाटनावर बहिष्कार टाकला आहे. अशातच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. विरोधकांना विश्वासात घेतले नसल्याचे म्हणत शरद पवारांनी मोदी सरकावर टीकास्त्र सोडले आहे.
मी अनेक वर्षांपासून राज्यसभेचा सदस्य आहे. आम्ही ज्या संसद भवनात बसतो तिथे नवी वास्तू होणार असल्याचे वृत्तपत्रात वाचलं. असा मोठा निर्णय घ्यायचा असेल तर संसदेतील सदस्यांशी चर्चा करायची आणि त्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. यानंतर त्याचे भूमिपूजनही झालं मात्र, विरोधकांना तेव्हाही आमंत्रण नव्हतं.
संसद भवन आता तयार झाले तर त्याचे उद्घाटन हे राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होत असते, ही पद्धत आहे. पण त्यांनी तेही केलं नाही. कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. आता विरोधी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आपली भूमिका घेतली आहे, ती आम्हाला मान्य आहे, असे शरद पवार यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींनी करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. परंतु, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन 28 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.