घरातील भगिनीने धाडस दाखवलं, मात्र कुटुंब प्रमुखाला...; शरद पवारांचा मुश्रीफांवर घणाघात
कोल्हापूर : कोल्हापूरातल्या काही लोकांनी भूमिका बदलली. ते ईडीला सामोरे जातील असं वाटलं होतं. पण, त्यांनी हिंमत दाखवली नाही, असा जोरदार घणाघात शरद पवारांनी नाव न घेता हसन मुश्रीफांवर केला आहे. ते आज कोल्हापूर येथे जाहीर सभेत बोलत होते. त्यांच्या भगिनींनी आम्हाला गोळ्या घाला असं ठणकावून सांगितलं होतं. मात्र, त्यांच्या कुटुंबाच्या प्रमुखांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं, अशीही टीका शरद पवारांनी केली आहे.
सत्तेचा वापर हा विरोधकांना नामोहराम करण्यासाठी सुरू आहे. कोल्हापूरमध्ये एका नेत्याच्या घरी ईडी, आयकर विभागाने धाडी मारल्या. त्या घरातील भगिनींनी आम्हाला हवं तर गोळ्या मारा पण असा छळ नको, असे बोलण्याचे धाडस दाखवले. मात्र, त्या घरच्या नेत्यांना हे धाडस दाखवता आलं नाही आणि ते भाजपच्या बाजूला जाऊन बसले. संजय राऊत, अनिल देशमुख, आणि मलिकांना तुरुंगात डांबलं. परंतु, ते घाबरले नाहीत. तर मला निवडणुकीआधी ईडीची नोटीस आली, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
चुकीच्या गोष्टींना महाराष्ट्रानं कधीही पाठिंबा दिला नाही. तर शाहू महाराजांनीदेखील चुकीच्या गोष्टीला कधीही पाठिंबा दिला नव्हता. सत्तेचा गैरवापर कुणी केला, तरुणांना कुणी बिघडवल? हे सगळं आपण बदलू. मोदींच्या हातातून सत्ता काढून घेऊन तरुणांच्या हाती देण्याची गरज आहे. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्याची संधी असल्याचे शरद पवारांनी म्हंटले आहे.