फडणवीसांच्या टीकेवर शरद पवारांचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, काम न करता फक्त शब्दांचा खेळ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मागील काही दिवसांपासून चांगेलच चर्चेत आहेत. निवृत्ती घोषणा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे अखेर त्यांनी निवृत्ती मागे घेतली. परंतु, विरोधकांकडून यावर प्रचंड टीका करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर टीका केली होती. त्यालाच आता शरद पवारांनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.
काय दिले पवारांनी प्रत्युत्तर?
आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, “ते काहीही बोलू शकतात. त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते काहीही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करतात. त्यामध्ये काही लोक वाकबगार असतात. आजच मी इथे आल्यावर बघितलं. कुणीतरी एक पत्रक काढलंय. भाजपाच्या अध्यक्षांच्या सहीने आहे बहुतेक ते. त्यांचं म्हणणं असं आहे की रयत शिक्षण संस्थेत मी सभासद नसूनही त्या संस्थेचा ताबा घेतला. रयत शिक्षण संस्थेत गेली ४० वर्षं मी सभासद आहे. पण असं एक खुळचटपणाचं विधान एका जबाबदार पक्षाच्या नेतृत्वानं करणं याकडे दुर्लक्ष केलेलंच बरं”, असा टोला त्यांनी लगावला.