पुण्यात अजित पवार गटाबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, माझी खात्री...आज ना उद्या...
शिवसेनेनंतर गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 35 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर या दोन्ही गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे. त्यातच पुण्यात रविवारी बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बंडखोर आमदारांबाबत मोठं वक्तव्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
पुण्यातील एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले, ईडीच्या कारवाईच्या भितीने आपल्या काही सहकाऱ्यांनी रस्ता बदलला आणि आज ते भाजपाच्या बाजूला जाऊन बसले आहेत. ते सांगतात ‘आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहोत. आम्ही आमची वैचारिक भूमिका बदलली नाही’. फक्त तुरुंगात जावं लागू नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, राजकारणात किंवा समाजकारणात सत्याची कास सोडून कोणीतरी असं वागत असेल तर माझी खात्री आहे की आज ना उद्या अशा भेकड प्रवृत्तीच्या लोकांना सामान्य जनता वेगळ्या ठिकाणी पाठवल्याशिवाय राहणार नाही. त्यांना पुढे अडचण झाल्याशिवाय राहणार नाही. असा देखील इशारा त्यांनी अजित पवार गटाला दिला.