'सिल्व्हर ओकवर नाक घासले आणि आता दिल्लीला मुजरा करायला जाताहेत'
मुंबई : राज्यात सध्या मोठ्या राजकीय हालचाली सुरु आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटण्यासाठी उध्दव ठाकरेंना दिल्लीला बोलवल्याची चर्चा सुरु आहे. यावर शिंदे गटाने हा मातोश्रीचा अपमान असल्याचे म्हणत उध्दव ठाकरेंवर शरसंधान सोडले आहे. सिल्व्हर ओकवर ते नाक घासून आले आणि आता दिल्लीला मुजरा करायला जात आहे, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.
मातोश्रीबद्दल आस्था असणार मी शिवसैनिक आहे. बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचा सिंहाचा वाटा होता त्यांनी राहुल गांधी येणार असे सांगत आहेत. ज्या वास्तूला बाळसाहेबांचा स्पर्श आहे. अशा वास्तूत राहुल गांधी येत आहेत आणि हे लोटांगण घालत आहेत. त्यातही राहुल गांधी आले नाहीत पण त्यांचा स्वीय सहायक पाठवला. हा मातोश्रीचा अपमान आहे, अशी जोरदार टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केली आहे.
मातोश्रीला सांगितलं जातयं दिल्लीला या. कुठे गेली ठाकरे या नावाची किंमत? मातोश्रीवर जाणे, बाळासाहेबांची भेट घेणं ही राष्ट्रपतीसाठी पण मोठी गोष्ट वाटतं होती. परंतु, सिल्व्हर ओकवर पण ते नाक घासून आले आहेत. आणि आता दिल्लीला मुजरा करायला जात आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. कुठे घेऊन गेले मातोश्रीचे विचार? उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यातला ठाकरी बाणा संपलेला आहे. उरलेले सर्व नगरसेवक, आमदार, खासदार यांची इथे रांग लागणार असल्याचा दावाही नरेश म्हस्के यांनी केला आहे.
दरम्यान, उध्दव ठाकरेंच्या भेटीनंतर के.सी. वेणुगोपाल म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा निरोप घेऊन मी आलो आहे. आमचा मेसेच हा स्पष्ट आहे, सध्याची राजकीय परिस्थिती, उद्धव ठाकरे कसा लढा देत आहेत, देशाची राजधानी कशाप्रकारे संपवली जात आहे याचे आपण साक्षीदार आहोत. काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत आहे. या लढ्यात आम्ही सगळे एकत्र आहोत, असे त्यांनी सांगितले.