मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अचानक उद्या दिल्ली दौऱ्यावर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद दिवसांदिवस वाढतच चालला आहे. हे सर्व सुरु असताना आता मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या अचानक दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे एकच चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शिंदे-फडणवीसांची महत्त्वाची बैठक होणार आहे. सीमावादाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी उद्या दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या बैठकीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यात मागील काही दिवसांपासून सीमावादावरून जोरदार खडाजंगी सुरु आहे. त्यातच राज्यातील विरोधीपक्ष हा चांगलाच आक्रमक झाला होता. त्यानंतर केंद्राने आणि अमित शाह यांनी ह्या विषयात मध्यस्थी करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात उद्या महत्त्वाची बैठक होणार आहे. एकनाथ शिंदे आणि फडणवीस उद्याच्या बैठकीसाठी उद्या सकाळी 11 वाजता दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.