अजितदादांच्या इंजेक्शनमुळे ते गर्भगळीत झालेत; शिंदे गटाचा आव्हाडांवर पलटवार
मुंबई : कळवा रुग्णालयामध्ये अनेक समस्या आहेत. कळवा रुग्णालय कोट्यवधी निधी खर्चून देखील त्याचा उपयोग होत नाही. स्मार्ट सिटी साठी पहिली आरोग्य सेवा द्या. ठाण्यात पायाभूत सुविधा वाट लागली आहे, अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. यावर आता शिंदे गटाने पलटवार केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला हा सर्व स्टंट असून स्वतःच्या टीमक्या वाजवून विनाकारण आमच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करणे बंद करा. सिव्हील रुग्णालय बंद असल्याने साहजिकच रुग्णांचा ओढा या महापालिका रुग्णालयात वाढला आहे. यामुळे प्रचंड ताण वाढलाय तरीही डॉक्टर्स त्यांच्यापरीने प्रचंड काम करत आहेत. उगाचच टीका करू नका, असे शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी म्हंटले आहे.
अजितदादांनी जे इंजेक्शन मारलं आहे. त्याच्यामुळे जे गर्भगळीत झालेत त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांनी शोधावं. चार ठिकाणी जावं. त्यावर काही उपाययोजना करण्याऐवजी विनाकारण डॉक्टरांवर टीका करणं, त्यांना धारेवर धरणं हे बंद करून स्वतःच्या पक्षाकडे पाहावं, असा टोला नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.