राऊतांवर टीका करताना गायकवाडांची जीभ घसरली; म्हणाले, बोकडांची औलाद तू...
राज्यात प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट असा वाद दररोज उफाळून येत आहे. शिंदे गटातील सर्व आमदार हे गुवाहाटीला जाणार असल्याची चर्चा असताना त्यावर बोलताना शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी मुंबईमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना शिंदे गटावर खोचक टीका केली आहे. ५० रेडे परत गुवाहाटीला जात आहेत. त्यांनी हवं ते दर्शन घ्या मात्र सुदर्शन चक्र आमच्या हातात आहे. या ५० रेड्यांचा नायनाट झाल्याशिवाय राहणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना संजय गायकवाड म्हणाले की, “संजय राऊत यांनी ५० रेडे गुवाहाटीला चालले आणि आमचे सुदर्शन चक्र त्याचा नायनाट करेल, अशी भाषा वापरली. ते आम्हाला रेडेच म्हणत असतील तर कदाचित आम्ही ज्ञानेश्वर माऊलींनी ज्या रेड्यांच्या तोंडून वेद बोलावले असतील तो हिंदुत्वाचा वेद म्हणणारे रेडे नक्कीच आहोत. राहिला सुदर्शन चक्राचा विषय तर श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राने अधर्मावर घाव घातलेला आहे.
संजय राऊत तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाण्याचा अधर्म केलेला आहे. त्यामुळे तुमचा राजकीय नायनाट होणार होईल. तुम्ही सारखे आम्हाला रेडे म्हणता तुमची औकाद एखाद्या गल्लीत गावात सांडासारखा मोकाट बोकड सोडलेला असतो. ज्याला कोणी कापत सुद्धा नाही. ज्याचा वास येतो, ज्यावा कोणी स्पर्श करत नाही. अशा बोकडांची तुम्ही औलाद आहात.” अश्या विखारी शब्दात गायकवाड यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.