युवराजांची कायमच 'दिशा' चुकली; शिंदे गटाच्या आमदारांचं आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन
मुंबई : राज्यात बुधवारी पावसाळी अधिवेशन वादळी ठरले. विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही आता आंदोलनास सुरुवात केली आहे. आजही सकाळपासून शिंदे गट आणि भाजप विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असून शिवसेना नेते आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी करण्यात येत आहे. युवराजांची कायमच दिशा चुकली, असे सत्ताधाऱ्यांच्या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे.
विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आंदोलन सुरु केले असून आज आंदोलनआदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी केली जात आहे. यावेळी आमदारांनी हातात धरलेल्या पोस्टरवर आदित्य ठाकरे यांचे व्यंगचित्र असून महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज व युवराजांची कायमच दिशा चुकली असे लिहित एकिकडे हिंदुत्व आणि दुसरीकडे महाविकास आघाडी, असा उल्लेख आहे.
तसेच, शिंदे गटाने कवितेद्वारे आदित्य ठाकरेंवर जोरदार निशाणा साधाला आहे. 2014 ला 191 चा हट्ट धरुन युती बुडवली, 2019ला खुर्चीसाठी हिंदुत्वांची विचारधारा पायदळी तुडवली. पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर, सत्ता गेल्यावर पर्यटनची आली लहर. पुन्हा निवडणूक लढवायची देतात ठसन, स्वतः आमदार व्हायला महापौर व दोन आमदारांचे लागले कुशन. खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार, सत्ता गेल्यावर आता फिरतात दारोदार. जनता हे खोटे अश्रू पुसणार नाही, तुमच्या या खोट्या रडगाण्यावर भुलणार नाही, अशी कविताही पोस्टरवर लिहिली आहे.
दरम्यान, राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशनाची आज सांगता होणार आहे. काल शेतकऱ्यांच्या मदतीसह वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. तसेच, विधानभवनाबाहेर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण रंगले होते.