'पुण्यासारख्या स्मार्ट सिटीचा विकास पावसात फक्त भिजला नाही तर वाहून गेला'

'पुण्यासारख्या स्मार्ट सिटीचा विकास पावसात फक्त भिजला नाही तर वाहून गेला'

पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले होते. यावरुन शिवसेनेने (ठाकरे गट) सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

मुंबई : पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पाणीच पाणी झाले होते. यावरुन शिवसेनेने (ठाकरे गट) सामना अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे. ‘आयटी’ची राजधानी, ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्याची दोन तासांत पडलेल्या 125 मिलीमीटर पावसाने दैना केली. ‘पुण्यात राहतोय की पाण्यात’ या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या ‘विनोदा’ने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला टांगली, अशा शब्दात शिवसेनेने भाजपवर टीका केली आहे.

पुणे तेथे काय उणे असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या पुणेकरांची स्थिती या आठवडय़ातील धुवांधार पावसाने दयनीय करून टाकली. गेल्या वर्षीही अशाच पावसाने पुण्याची दुरवस्था केली होती. सोमवारी पुण्यात दोन तासांत सुमारे 125 मिलीमीटर पाऊस कोसळला आणि या पावसाने पुणे शहराची अक्षरशः वाताहत झाली. माणसांपासून यंत्रणांपर्यंत सगळेच हतबल झाले. सोमवारी रात्री जगाने जे तुंबलेले आणि बुडलेले पुणे पाहिले ते भयंकरच होते. एरवी मुंबई महापालिकेला हिणविणारे आणि शिवसेनेकडे बोट दाखविणारेच पुणे महापालिकेत सत्तेवर आहेत. मात्र नैसर्गिक आपत्ती, निसर्गावर माणसाचे नियंत्रण नाही, ढगफुटीसारखा पाऊस अशा केविलवाण्या पळवाटांवरून ते पळ काढीत आहेत. पाऊस कमी वेळात जास्त कोसळला हे खरे असले तरी तो अतिप्रचंड वगैरे म्हणता येणार नाही. तरीही पुण्याच्या तथाकथित विकासाचे रस्त्यारस्त्यांवर जलार्पण झाले. पुणे महापालिकेत सत्ता राबविणाऱ्या भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न दाखविले. मात्र स्मार्ट सिटी तर दूरच; पण पुण्याचे कसे वाटोळे झाले आहे ते सोमवारच्या पावसाने दाखविले. स्मार्ट सिटी म्हणवून घेणाऱ्या पुण्यात आधीच वाहतूककोंडीने कहर झाला आहे. साधे पाच-सहा किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दीड-दोन तास लागावे यासारखा ‘विकास’ कोणत्याही शहराच्या नशिबी येऊ नये, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

स्मार्ट सिटी पुण्यात घडले. पुणे बदलतंय की पुणे तरंगतंय, असा प्रश्न आज जगाला पडला आहे. पुणे महापालिकेच्या आयुक्तांनी रस्त्यावरील पुराच्या परिस्थितीचे खापर पावसावर फोडले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पाऊस पुणे महानगरपालिकेला विचारून किती पडायचं हे ठरवत नाही’ असे ढगफुटीलाही गुदगुल्या करणारे वक्तव्य केले. पाऊस जरी विचारून पडत नसला तरी नियोजन महानगरपालिका आणि सरकारी यंत्रणाच करते ना? देशात, राज्यात आणि पुणे महानगरपालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भाजपने पुण्याच्या विकासाचे भलेमोठे स्वप्न दाखविले, परंतु भाजपच्या स्थानिक कारभाऱ्यांनी कसा कारभार केला त्याचा पर्दाफाश सोमवारी तेथील रस्त्यारस्त्यांवर झाला. शहराचे मूळ प्रश्न सोडविण्यापेक्षा केवळ दिखावू, शोभेची कामे करण्यातच रस दाखविला गेला. जलव्यवस्थापन, मलनिस्सारण, कचरा व्यवस्थापन, रस्ते अशा मूलभूत कामांचे नियोजन करण्याऐवजी सुशोभिकरणाचा डोलारा करण्यातच महापालिकेचे कारभारी मश्गूल राहिले. कचरा व्यवस्थापनावर कोटय़वधी रुपये खर्च होऊनही राष्ट्रीय स्वच्छ शहर स्पर्धेत पुण्याचे मानांकन घसरते तेव्हाच विकासाच्या गप्पा आणि थापा लक्षात येतात. शहराचे नियोजन काय केले ते पुणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना आणि त्यांच्या पाठीशी असलेल्या ‘महाशक्ती’ला सांगावे लागेल, असेही शिवसेनेने म्हंटले आहे.

अर्धवट असलेल्या मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्याचे धाडस पुण्यातील भाजपच्या कारभाऱ्यांनी केले. निवडणुकांची चाहूल असताना संपूर्ण पुणे भाजपच्या होर्डिंग्जने नटले होते. पुणे बदलतंय अशी शेखी हे फलक मिरवीत होते. सोमवारच्या पावसात हे सगळेच फलक, त्यावरील आश्वासने, स्वप्ने वाहून गेली. पुण्याचा विकास या पावसात फक्त भिजला नाही तर वाहून गेला. विकासाच्या नावावर आपापल्या घरांवर तोरण हेच धोरण राबविले गेले काय, असा प्रश्न यानिमित्ताने पडतो. ‘आयटी’ची राजधानी, ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’, विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी कौतुकमिश्रित बिरुदे आणि विशेषणे मिरविणाऱ्या पुण्याची दोन तासांत पडलेल्या 125 मिलीमीटर पावसाने दैना केली. ‘पुण्यात राहतोय की पाण्यात’ या समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या ‘विनोदा’ने शहर नियोजन आणि विकासाच्या दाव्यांची अब्रू वेशीला टांगली. ‘पुणे तेथे काय उणे’ असे कधीकाळी अभिमानाने मिरविणाऱ्या या ‘स्मार्ट सिटी’चा एवढा ‘पाण’उतारा आधी कधीच झाला नाही. तो महापालिकेला न विचारता पडलेल्या पावसाने केलेला नाही, तर बेताल शहर नियोजन आणि दिखाऊ स्मार्ट सिटी व्यवस्थापन यामुळे झाला आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com